बाबा-दादांच्या राजकारणामुळे रखडली पीएमआरडीएची स्थापना – गिरीष बापट

पुणे, दि. २३ – बाबा- दादांचे पक्षीय राजकारण आणि वैयक्तिक हेवेदावे यामुळे पुणे महानगर प्राधिकरण (पीएमआरडीए) रखडले आहे. पीएमआरडीएची स्थापना झाली तर विकासात आपल्याला स्थान राहणार नाही,अशी भीती पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाटत आहे, तर मुख्यमंत्री पृथ्वीराज यांना पीएमआरडीएवरील नियंत्रण सोडायचे नाही, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि लोकलेखा समितीचे अध्यक्ष गिरीश बापट यांनी केला.
    बापट म्हणाले,  दोनशे किलोमीटर क्षेत्र पीएमआरडीएच्या अधिपत्याखाली असणार आहे. त्यामुळे शहरावरील नियंत्रण सुटण्याची भीती पालकमंत्र्यांना वाटते आहे. तसेच पीएमआरडीएचे अध्यक्षपदही त्यांना हवे आहे. तर मुख्यमंत्री पृथ्वीराज यांनाही त्यावर नियंत्रण हवे आहे. तीन महिन्यात पीएमआरडीए स्थापन करण्याची शासनाची घोषणाही हवेतच विरण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.
    कॅगच्या अहवालाबाबत बोलताना ते म्हणाले की, कॅग ही स्वायत्त आणि घटनात्मक संस्था आहे. त्यावर भाष्य करण्याचा अधिकार कुणालाही नाही. अटी आणि शर्तीच्या नियमांचा भंग केल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे. कोणाला जमीन दिली, याबाबत त्यामध्ये उल्लेख नाही. कॅगच्या अहवालानुसार असणार्‍या अनियमिततेबाबत काय कारवाई करता येईल, याबाबत आपण शासनाकडे सूचना मांडणार आहोत, असेही ते म्हणाले.