आरटीओकडे साडेआठशे कोटी महसूल गोळा यंदा पावणे दोनशे कोटींनी महसुलाचा आकडा वाढला

पुणे, दि.२३ – दोन लाखांहून अधिक नवीन वाहन नोंदणी,  दंडात्मक कारवाई आणि थकबाकी वसुलीमुळे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वर्षभरात सुमारे साडेआठशे कोटी रुपयांच्या महसुलाचा पल्ला गाठला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महसुलाचा आकडा पावणेदोनशे कोटी रुपयांनी वाढला असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी दिली.
    वाहन खरेदीचा शहरवासियांचा ट्रेंड गेल्या वर्षभरातही कायम राहिला आहे. मागील वर्षभरात शहराच्या रस्त्यावर दोन लाख नव्या वाहनांची भर पडली आहे. त्यात विशेषत: दुचाकीला अधिक पसंती दिल्याचे आरटीओ कडील आकडेवारीवरून स्पष्ट झाले. २०११ -१२ या आर्थिक वर्षात सुमारे १ लाख  ५५ हजार ५०६ दुचाकींची नोंदणी झाली आहे. यामध्ये बाईक, स्कूटर,  मोपेड यांचा समावेश आहे, तर सुमारे ४८ हजार २३ चारचाकी वाहनांची नोंदणी झाली आहे.
    पुणे शहरातून ४४० कोटी २५ लाख ८४ हजार रुपयांचा महसूल मिळाला असून, पिंपरी-चिंचवड शहरातून २७४ कोटी ११ लाख ४० हजार रुपयांचा महसूल जमा झाला आहे. बारामती विभागातून १३ कोटी ७८ लाख ४५ हजार, तर अकलूज विभागातून ३९ कोटी २६ लाख ६ हजार  आणि सोलापूर विभागातून ६९ कोटी ५७ लाख ७४ हजार रुपये असा पुणे विभागाला एकूण ८५० कोटी ९९ लाख ४९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे धायगुडे यांनी सांगितले.

चौकट
 वर्षभरात ४२४ विदेशी बनावटीच्या गाड्या पुणे शहरात दाखल झाल्या आहेत. यामध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे. इम्पोर्टेड गाड्यांमार्फत १९ कोटी ७१ लाख ३२ हजारांचा महसूल परिवहन विभागाला प्राप्त झाला आहे. इम्पोर्टेड गाड्यांमध्येही मागील वर्षीच्या तुलनेत भर पडली आहे.