केन्द्रातले सरकार पूर्णपणे गोंधळून गेलेल्या नेत्यांचे आणि पक्षांचे सरकार आहे. या सरकारचे प्रमुख आर्थिक सल्लागार कौशिक बसू हेही गोंधळून गेले आहेत. सरकार गोंधळलेले आहे कारण, त्याचे सल्लागारही गोंधळलेले आहेत. बसू यांनी आपल्या मनातला गोंधळ स्पष्ट केला आहे. २०१४ सालपर्यंत भारतात आर्थिक सुधारणांच्या दिशेने एकही पाऊल टाकले जाणार नाही, इतके सरकार रेंगाळलेले आहे असे बसू यांनी यूरोपातल्या आपल्या दौर्यात बोलताना म्हटले.
त्यावर गदारोळ माजला आणि आता त्यांनी मंत्र्यांप्रमाणे खुलासा केलाय. आपल्याला तसे म्हणायचे नव्हते आणि आपले म्हणणे विपरीत स्वरूपात प्रसिद्ध झाले आहे वगैरे खुलासा त्यांनी केला आहे. त्यांचा हा खुलासा पटण्यासारखा नाही. त्यांनी पहिल्यांदा जे काही म्हटले होते ते अगदी स्पष्ट होते. बसू खूप विद्वान आहेत, पण त्यांच्या भाषणांचे वार्तासंकलन करणारे पत्रकारही कोणी गावगन्ना अशिक्षित वार्ताहर नाहीत.
त्यामुळे आपले म्हणणे त्यांना समजलेच नाही असे काही ते म्हणू शकत नाहीत. २०१४ सालपर्यंत भारतात आर्थिक सुधारणांचे एकही पाऊल टाकले जाणार नाही. हे त्यांनी म्हटलेले आहे पण बातमीदाराने ते वाक्य देताना, ‘२०१४ साल’च्या ऐवजी ‘येत्या निवडणुकांपर्यंत’ असे म्हटले. एवढा एक फरक सोडला तर बसू यांची वाक्ये तशीच आहेत आणि त्यांनीही ती तशीच बोलल्याचे मान्य केले आहे. त्यांचा खुलासा एवढाच आहे की, युरोपमध्ये २०१४ साली पुन्हा एकदा मोठी मंदी येणार आहे आणि तोपर्यंत आपल्या देशात काही पावले टाकली जाणार नाहीत.
आता २०१४ सालचे बसू यांचे भाकीत हेच मुळात निराधार आहे. पण ते खरे आहे असे मान्य केले तरीही यूरोपात ती मंदी येणार आणि भारतात मोठे निर्णय होणार नाहीत यांचा काहीही संबंध नाही. पण बसू यांनी इतके उघडे नागडे सत्य सांगितले होते की त्या सत्याचा भगभगीत प्रकाश सरकारच्या नाकर्तेपणावर भक्क झोत टाकणारा ठरला. आपण या सरकारच्या कामाचे मूल्यमापन करत आहोत पण आपण त्याचे सल्लागार आहोत याचे त्यांना स्मरण राहिले नाही.
आता मात्र खुलासा करताना त्यांनी, येत्या सहा महिन्यात सरकार काही मोठे निर्णय घेईल असे म्हणून आपल्या विधानावर पांघरूण घालण्याचा व्यर्थ प्रयत्न केला आहे. आपण वादासाठी असे समजू की, बसू यांनी काहीच म्हटलेले नाही आणि ते काहीच बोललेले नाहीत. तरीही हे सरकार नाकर्तेपणाची कमाल पातळी गाठलेले सरकार आहे हे सत्य समोर दिसतच आहे. ही गोष्ट बसू यांनी सांगण्याची तशी काहीच गरज नाही.
बसू यांनी या गोष्टीवर केवळ शिक्कामोर्तब केले आहे. त्या शिक्क्याला महत्त्व आहे. ते करताना बसू यांनी सरकारच्या कूर्मगतीचे काही तपशील दिले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे एकामागे एक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत असल्याने सरकारी अधिकारी कामे करायला धजावत नाहीत.
प्रशासनाची गती कमी होण्याचे ते एक कारण आहे. खरे तर हे काही कारण नाही. तो काम न करण्यासाठीचा बहाणा आहे. कामे केली तर भ्रष्टाचार होतो मग त्यापेक्षा कामे न केलेली बरी अशी अधिकार्यांची मनस्थिती आहे असे बसूंचे म्हणणे आहे. असे असेल तर मग सरकारने काय करावे ? या अशा अधिकार्यांच्या बहाण्यापुढे सरकार टेकावेत का ? तसे होत असेल तर या सरकारचा अधिकार्यांवर वचक नाही असे म्हणावे लागेल.
अधिकार्यांना दिला जाणारा लठ्ठ पगार काही अडप झडप कशीही कामे करण्यासाठी दिला जात नाही. त्यांना वेगाने आणि तरीही स्वच्छ हाताने कामे करता येत नसतील तर त्यांना सरकारने लाखो रुपये खर्चुन दिलेले प्रशिक्षण काय कामाचे ? कामे केली तर भ्रष्टाचार होतोच, तेव्हा आम्ही कामे करायची तरी कशाला, असा सवाल करणार्या या अधिकार्यांना घरी पाठवण्याची ताकद या सरकारमध्ये नाही. मुळात हा बहाणा खोटा आहे.
सध्या देशात माहितीच्या अधिकारामुळे अनेकांच्या मनमानी भ्रष्ट कारभाराला चाप बसला आहे. अशा लोकांनी माहितीच्या कायद्याला बदनाम करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्याचा हा भाग आहे. या कायद्याने सरकारच्या कामाचा वेग कमी होत असतो, अधिकारी कामे करायला धजावत नाहीत, या कायद्याचा दुरुपयोग होत आहे असा सतत प्रचार करून हा कायदा अगदीच निरुपद्रवी करून टाकण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे.
त्यांनीच या अफवा पसरवायला सुरूवात केली आहे. याच माहितीच्या कायद्याखाली या अडेल अधिकार्यांच्या शेपट्या पिरगाळून त्यांना कामाला लावता येते. पण हे सरकारच मुळात गतीमंद आहे. बसू यांनी सरकारच्या निकम्मेपणाला ‘आघाडी’ कारणीभूत असल्याचेही म्हटले आहे. पण आघाडी काही अकार्यक्षमतेचे कारण नाही. या सरकारमध्ये आघाडीचे सरकार चालवण्याचे, आघाडीचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्य नाही हे खरे कारण आहे.
देशात एका पक्षाचे सरकार असेल तरच वेगाने काम करता येते असा गैरसमज निर्माण केला जात आहे. तसे असते तर राजस्थान, आंध्र प्रदेश, दिल्लीत कॉंग्रेसची आणि कर्नाटकात भाजपाचे एक पक्षीय सरकार आहे. या सरकारची कामगिरीच असे सांगत आहे की सरकारची अकार्यक्षमता आणि त्याचे स्वरूप यांचा काहीही संबंध नाही. नाचता येणे महत्त्वाचे. अंगण वाकडे आहे हा खोटा बहाणा आहे.