सामाजिक क्षेत्रातील मिस इंडिया व्हायचय – हसलिन कौर

नागपूर, दि. २१ – ग्लॅमरच्या विश्‍वात पाऊल टाकले आहे. त्यामुळे या क्षेत्रात स्वतःच्या क्षमता सिद्ध करणे हेच माझे स्वप्न आहे. पण, सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देऊ शकेन त्यादिवशी खर्‍या अर्थाने मिस इंडिया असल्याचा आनंद मला होईल, असे फेमिसा मिस इंडिया २०११ हसलिन कौर हिने व्यक्त केले.
    नागपुरात एका खास कार्यक्रमाच्या निमित्ताने आली असता तिने पत्रकारांशी संवाद साधला. शिक्षण घेत असताना मॉडेलिंगच्या क्षेत्रात आले. हवे तसे यशही मिळत गेले. आता बॉलीवुडमध्येही एंट्री करण्याची तयारी केली. पण एवढे सगळे करत असताना सामाजिक बांधीलकी मला आवर्जुन जपायची आहे. सध्या किरण बेदी यांच्या दिल्ली येथील नवज्योती या सामाजिक एनजीओशी मी जुळलेली आहे. या संस्थेसाठी एक डोनर म्हणून माझी भूमिका असली तरीही महिला सशक्तीकरण, ग्रामीण शहरी विकास, स्त्री आणि मुलांचे शिक्षण आदी विषयांशी संबंधित उपक्रमांमध्ये माझा सहभाग असतो. काही ठिकाणी गरज पडल्यास कौन्सिलर म्हणूनही जात असते, अशी माहिती हसलिनने दिली.