
पुणे, दि. २१ – गावातील एखादा तंटा पोलिस स्टेशनमध्ये आल्यास, दोघांचीही बाजू समजून घेऊन तो तंटा मिटविण्याऐवजी पोलिसच तो वाढवतात. यामुळे तंटे कमी होण्याऐवजी वाढले आहेत, अशी टीका खुद्द गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आपल्या पोलीस दलावर केली. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील पारितोषिक प्राप्त ९४२ ग्रामपंचायत पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन बालेवाडी येथे करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
सध्या गावात स्थापना होणार्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाचा कालावधी एक वर्षाचा आहे. येत्या वर्षापासून अध्यक्षपदाच्या कालावधी वाढ करुन तो दोन वर्षांचा करण्यात येणार आहे. गटातटातील राजकारणामुळे पक्षापक्षातही तंटे वाढत आहेत. लोकांचे प्रतिनिधीच जर असे गावापासून ते दिल्लीपर्यंत राजकारणात तंटामुक्ती अभियान राबविण्याची वेळ आली आहे.
सध्या अनेक ठिकाणच्या देवस्थानातील मुर्त्यांच्या चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. साहजिकच नागरीकांकडून त्याचा दोष पोलिसांना देण्यात येत आहे. मात्र, पोलिस कुठे कुठे जाणार ही गोष्ट समजून घेऊन तंटामुक्त समित्या व ग्रामस्थांनी आपल्या धर्मस्थळांची मंदिरांची काळजी घेतली पाहिजे. निर्मल ग्राम योजनेच्या माध्यमातून गावे स्वच्छ होतानाच त्यात राहणार्या नागरीकांची मने स्वच्छ करणे गरजेचे होते. त्यामुळे तंटामुक्त मोहीम राबविली जात आहे. आजपर्यंत राज्यातील जी गावे तंटामुक्त झाली आहेत. त्या गावांना पारितोषिक मिळाल्यापासून पुढील तीन वर्ष जर ती गावे तंटामुक्त राहीली तर अशा गावांनाही येत्या काळात प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात येणार आहे, असे आर. आर. पाटील यांनी सांगितले.
हर्षधर्वन पाटील म्हणाले, सध्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील तंटे मिटत असले तरी जिल्ह्यातील लोकसंख्या पहाता पोलिसांच्या संख्येत वाढ करणे आवश्यक आहे. पुणे शहर हे केंद्रस्थानी असल्यामुळे अनेक मंत्र्यांसह महत्वाच्या अधिकार्यांची या शहरात ये-जा असते. मात्र, त्यांच्या सोयीसाठी शासकीय गाड्यांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे नवीन गाड्या खरेदी करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तंटे मिटविण्यासाठी जिल्ह्यात पोलिस स्टेशन आणि चौक्यांमध्ये वाढ करण्याची गरज असल्याचे पाटील यांनी सांगितले.
