लष्करप्रमुख व्ही.के.सिंग यांना लाच देण्याचा प्रयत्न लष्कराबद्दल लिहिण्याची गरज – नाईक

पुणे, दि. २१ (प्रतिनिधी) – लष्करप्रमुख व्ही.के.सिंग यांना लाच देण्याचा प्रयत्न झाला. लष्करप्रमुखांच्या या विधानामध्ये तथ्य असेल. या बाबतीतील माहिती लवकरच उजेडात येईल, अशा शब्दात लष्करप्रमुखांचे माजी हवाई दल प्रमुख पी.व्ही. नाईक यांनी समर्थन केले.
    पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित ज.स.करंदीकर व्याख्यानमालेमध्ये सैन्यदल आणि माध्यमे या विषयावर नाईक बोलत होते. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश घोंगडे यावेळी उपस्थित होते.
    भारतीय लष्कर युध्दाच्या दृष्टीने परिपूर्ण नाही. अद्यायावत शस्त्रे नाहीत, अशी चर्चा सध्या प्रसारमाध्यमांमध्ये सुरू आहे, यावर भाष्य करताना नाईक म्हणाले, या चर्चेमध्ये थोड्याफार प्रमाणात तथ्य आहे. याला मागील  दहा वर्षांपूर्वी संरक्षण विषयी सुरू असलेली प्रक्रियाच जबाबदार आहे. लष्कराने अद्यायावत तंत्रज्ञान, शस्त्रे ताबडतोब मिळत नव्हती. एखाद्या गोष्टीची मागणी केल्यानंतर ती वर्षोनुवर्षे मिळत नाहीत, अर्थात याला देशातील परिस्थितीच जबाबदार आहे. शासनाकडेही पैसा, अद्यायावत तंत्रज्ञान उपलब्ध नसायचे. मात्र, याचा अर्थ आपले लष्कर हातावर हात धरून बसले नाही. कुणीही येऊन हमला करावा इतके कमजोर देशाचे लष्कर  नाही. सध्या असलेली लष्कराची परिस्थिती गंभीर असली तरीही धोकादायक नाही, असे सांगून राष्ट्रीय सुरक्षीततेबद्दल बोलताना नाईक म्हणाले, देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेबद्दल काही बोलले जात नाही. याबाबतची माहिती नेहमी लपवली जाते. ब्रिटिश काळापासून माहिती लपवण्याची अशीच पध्दत रुढ आहे. या पध्दतीत सुधारणा केली पाहिजे. आर्म्ड फोर्सेस बदलची माहिती लपवता कामा नये. त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. शासनाने हे लवकरच सुरू करण्याची गरज आहे. भविष्यात मिडीया याबाबत गप्प बसणार नाही. यासाठी सरकारने आताच जागृत होण्याची वेळ आहे.
    मिडीयातील बहुतांश लोक लष्कराबद्दल परिपूर्ण माहिती नसताना लिहितात. न्यायालयीन प्रक्रीया पूर्ण होण्यापूर्वीच एखाद्याला दोषी ठरवतात, हे पूर्णपर्णे चुकीचे आहे. यासाठी लष्करात काम केलेले, लष्कराचा अभ्यास असलेल्या लोकांनी प्रसारमाध्यमांमध्ये लष्कराबद्दल लिहिण्याची गरज आहे. त्यामुळे जेणेकरून लष्कराबद्दलची अधिकाधिक सत्य माहिती समोर येईल, असेही नाईक म्हणाले.