
ठाणे, दि. २१ – ठाणे पालिकेच्या सर्वसाधारण सभेतील राष्ट्रवादी आणि शिवसेना नगरसेवकांचा राडा, त्यातच तहकूब सभेत स्थायी समिती सदस्यांची निवड बेकायदेशीर असल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केला. याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिले असून वेळ पडल्यास न्यायालयातही जाण्याचा इशारा आव्हाड यांनी दिला.
शुक्रवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभा तहकूब झाल्यानंतर महापौरांनी ती बेकायदेशीरपणे चालवून त्यात स्थायी समिती सदस्यांची निवड केली. ती बेकायदेशीर आहे. कोकण आयुक्तांच्या निर्देशानुसार पालिकेत तीनच गट असताना महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी मात्र प्रत्येक पक्षाला वेगवेगळा गट दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यातच महापौर चुकीचे निर्णय देत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला.
महापौरांच्या या अंधाधुंद कारभारामुळे महापौर हरिश्चंद्र पाटील यांचे महापौरपद व सदस्यपद रद्द व्हावे, अशी मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र देऊन करण्यात आली आहे. तसेच या विरोधात राष्ट्रवादी न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
