क्षेपणास्त्र हे आपल्या आघात शक्तीचे द्योतक आहे. आपल्याकडे किती लांबवर आणि अचूक मारा करणारे क्षेपणास्त्र असेल तेवढे आपण सामरिकदृष्ट्या समर्थ समजले जात असतो. भारताने काल ५ हजार किलो मीटर अंतरावर मारा करणारे अग्नि-५ हे क्षेपणास्त्र डागून त्याच्या मारा करण्याच्या क्षमतेची चाचणी घेतली. या क्षेपणास्त्राला आंतर खंडीय क्षेपणास्त्र म्हटले जाते कारण ते आशिया खंडाच्या बाहेरही मारा करू शकते आणि त्याला दिलेल्या दिशेने १ हजार किलो वजनाची अण्वस्त्रे नेऊन तिथे विध्वंस घडवू शकतो. ही चाचणी यशस्वी झाली आहे. याचा अर्थ आपण आता अशी क्षमता बाळगणार्या जगातल्या पाच देशांत सहभागी झालो आहोत. या यशाबद्दल आपल्या शास्त्रज्ञांचे आणि तंत्रज्ञांचे अभिनंदन केले पाहिजे. भारताच्या संरक्षण खात्याशी निगडित असलेल्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) या यंत्रणेने हे काम केले आहे. या संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार सारस्वत यांच्या नेतृत्वाखाली हे काम झाले आहे. आपण येथेच थांबणार नाही अग्नि सहाची आपली तयारी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यास आपण जगात कोणत्याही ठिकाणच्या लक्ष्यावर भारतात बसून अण्वस्त्रे टाकू शकू. अग्नि पाच चा पल्ला पाच हजार किलो मीटर असल्याने आपण या क्षेपणास्त्राच्या साह्याने अमेरिका वगळता कोणत्याही देशात अण्वस्त्रे टाकू शकतो. पण पुढच्या चाचण्या यशस्वी झाल्यास आपण अमेरिकेलाही मार्याच्या टप्प्यात घेऊ शकू. कारण त्यावेळी १० हजार किलो मीटरच्या आतले कोणतेही ठिकाण या क्षेपणास्त्राच्या आवाक्यात येऊ शकते. भारताची ही तयारी फारच स्पृहणीय आहे. क्षेपणास्त्राच्या बाबतीत या आधी आपण ब्रम्होसच्या साह्याने जगाला थक्क केले होते. ब‘म्होसचा टप्पा कमी असला तरी ते जगातले सर्वात वेगवान क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राचा आपण केवळ वापरच करीत नाही तर व्यापारही करीत आहोत. काही देशांनी ब्रम्होसची मागणीही केली आहे. अमेरिकेकडेही त्याच्या एवढ्या वेगाचे क्षेपणास्त्र नाही. अग्नि पाचचेही असेच मार्केटिंग होण्याची शक्यता आहे. आता आपण पाच हजार किलो मीटर टप्पा असलेले क्षेपणास्त्र विकसित केले आहे आणि चीनची राजधानी त्याच्या टप्प्यात येऊ शकते. असे असले तरीही आपण काही त्याचा वापर करणार नाही. आजच्या जगातली शस्त्रस्पर्धा ही शस्त्रांच्या वापराची नाही तर शस्त्र सज्जतेची आहे. आपल्याकडे चीनपेक्षा अधिक मोठे क्षेपणास्त्र आहे ही माहितीच पुरेशी आहे. तसे आहे म्हणूनच आपल्या अग्नि पाचच्या चाचणीने चीनला मिरच्या झोंबल्या आहेत. खरे तर भारत आणि चीन यांच्या शस्त्र सज्जतेत खूप फरक आहे. अनेक बाबतीत चीन वरचढ आहे. तसा तो असल्यामुळेच आशिया खंडातला सत्ता समतोल बिघडायला लागला होता. म्हणून भारताचा असा एखादा दणका हवा होता. तो बरोबर बसला आहे. शेवटी भारताकडे हे क्षेपणास्त्र आहे ही माहितीच समतोल साधण्यास उपयुक्त ठरणारी आहे. आताच्या काळात क्षेपणास्त्रांचे टप्पे आणि त्यांची मारक क्षमता यावरच जगाचे राजकारण बदलणार आहे. याचे एक उदाहरण रशियाच्या बाबतीत दिसून आले आहे. जगाच्या राजकारणात रशियाचे महाशक्ती म्हणून असलेले महत्त्व कमी झाल्यापासून अमेरिकेची दादागिरी वाढली होती. जगाचे राजकारण अमेरिका आणि रशिया या दोन ध्रुवांच्या भोवती फिरण्याऐवजी अमेरिका या एकाच ध्रुवाभोवती फिरायला लागले होते. अमेरिकेने आपल्या सामर्थ्याच्या मस्तीत इराकमध्ये मनमानी राजकारण केले. पण इराणच्या बाबतीत अमेरिकेला तशी पावले टाकता आली नाहीत कारण इराकच्या पाठोपाठ इराणमध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप सुरू होईपर्यंत रशियाने आपल्या नव्या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. रशियाच्या या चाचणीत इराण त्या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येत असल्याचे दिसले होते. रशियाचे क्षेपणास्त्र इराणपर्यंत येऊ शकते या एवढ्या माहितीनेच अमेरिकेची इराणमधली मनमानी आटोक्यात आली. क्षेपणास्त्राचा हा प्रभाव आहे. त्यासाठी त्याचा वापर करावा लागत नसतो. तर त्याची क्षमता केवळ चाचणीतून दाखवावी लागते. रशियाच्या या चाचणीने सत्ता समतोल साधला गेला. भारताच्या अशा चाचण्यांचा चीनवर परिणाम होत असतो. होत आहे. भारताने केवळ क्षेपणास्त्रात अशी तयारी केलेली आहे असे नाही तर तिन्ही दळांत ती केली आहे. भारताचे हवाई दल तर प्रभावी आहेच पण अजून नौदलात काही गोष्टी करायच्या आहेत. आपल्या नौदलात अजून अण्वस्त्रसज्ज पाणबुड्या नाहीत. त्या आपल्याला तैनात कराव्या लागणार आहेत. अरिहंत ही अशी पाणबुडी तयार होत आहे. आता आपल्या नौदलात चक्र ही पाणबुडी दाखल झाली असून १५ दिवसांपूर्वीच तिने रशियाच्या व्हलाडीव्हस्टाक या बंदरापासून विशाखापटणम पर्यंतचा पाच हजार किलोमीटरचा प्रवास यशस्वी केला आहे. या पाणबुडीचे कार्यान्वयन अणु ऊर्जेवर केले जाते. पण तिच्यावर अण्वस्त्रे डागली जात नाहीत. या चक्र पाणबुडीची चाचणी आणि अग्निचे परीक्षण या दोन गोष्टी आपल्या सामर्थ्याच्या द्योतक आहेत. मग त्यामुळे चीनचा कितीही का जळफळाट होईना.
