
नाशिक, दि. १८ – नाशिक प्रादेशिक परिवहन मंडळाने (आरटीओ) प्रत्येक रिक्षाला इलेक्टॉनिक्स मीटर सक्तीचे केले असून, टप्याटप्प्याने प्रत्येक रिक्षाला हे मीटर बसविले जाईल व त्या रिक्षावर `मीटर प्रमाणे भाडे घेणारी रिक्षा’ असा शिक्का मारण्यात येईल, अशी प्रशासन रचना असून त्याप्रमाणे कार्यवाही सुरु केली आहे. रिक्षा चालकांनी यास विरोध केला असला तरी नवीन रिक्षांना तातडीने लगेचच तर जुन्या रिक्षांना हळुहळू टप्याने हे मीटर बसविले जाणार आहेत.
रिक्षांची वाढती संख्या, पेट्रोलची भाववाढ या बरोबरच रिक्षांना नियमित करावी लागणारी दुरुस्ती, ऑईल यासह इतर मेंटेनन्सचा खर्च, रिक्षा चालकांना जादा होत आहे. आता या खर्चात भर म्हणून हा नवीन इलेक्ट्रॉनिक्स मीटरचा `फंडा’ का म्हणून काढला? असा रिक्षा चालकांचा आरटीओ प्रशासनाला सवाल आहे. अगदीच आतल्या गोटातले सांगायचे झाले तर, ट्रॅफिक पोलिसांना नियमित दिले जाणारे हप्ते देखिल आम्ही कसे भरतो हे आमचे आम्हाला माहिती, असे एका रिक्षा स्टॅण्डवरील दहा-बारा रिक्षाचालकांनी उघड-उघड सांगितले. आरटीओ प्रशासन हे नेहमीच हातावर पोट भरणार्या रिक्षाचालकांच्या मागे लागलेले असते, असे रिक्षाचालक व मालक युनियन म्हणते. तर दुसरीकडे आरटीओ प्रशासनाने मात्र हा नियमित कामकाजाचा भाग असून शहरात वाढणारी रिक्षाचालकांची अरेरावी, प्रवाशांशी होणारी रोजची कटकट व शहरात येणारे नवीन यात्रेकरुची होणारी नित्याचीच लूट थांबविण्यासाठी व आधुनिक तंत्रज्ञाची मदत रिक्षाचालकांनी घेतलीच पाहीजे. त्यामुळे रिक्षाचालकांचे उत्पन्न देखिल वाढण्यास मदत होणार आहे, असे आरटीओ प्रशासनाचे मत आहे.
