
अकोला, १७ – आयुर्वेदिक औषधी तयार करणार्या उद्योगाला लागणार्या ९० टक्के वनस्पतींचा पुरवठा जंगलातून होत असल्याने तब्बल ४० दुर्मिळ वनस्पतींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याची दखल घेत वनौषधी महामंडळाने या वनस्पतींचा रेड झोनमध्ये समावेश केल्याची माहिती नागार्जून उद्यानाचे प्रमुख डॉ. संजय वानखेडे यांनी दिली.
भारतीय संस्कृतीने जगाला आयुर्वेद चिकित्सापद्धतीची ओळख करून दिली. आयुर्वेदाला समृद्ध करणार्या ऋषींची एक वैभवशाली परंपरा भारतीय संस्कृतीला लाभली आहे. यामध्ये सुश्रुत, धन्वंतरी, नागार्जून आदी ऋषींचा समावेश आहे. यातील नागार्जून ऋषींनी आयुर्वेदात प्रथमत: वनस्पती रसायनांचा वापर केला होता. याच ऋषीच्या नावावरून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात नागार्जून वनौषधी उद्यानाची स्थापना करण्यात आली. आपला देश, राज्य, विभाग आणि परिसरात सापडणार्या औषधी वनस्पतीचे संगोपन आणि जतन या उद्यानात करण्यात येत आहे.
सन १९७६ साली स्थापन झालेल्या या उद्यानाने १९९४ साली भारतीय कृषी अनुसंधान परिषदेकडून मिळालेल्या भरघोस निधीच्या माध्यमातून कात टाकली. भारतीय समन्वयक प्रकल्प औषध आणि सुगंधी वनस्पती प्रकल्पांतर्गत या उद्यानाची निवड करण्यात आली असून तब्बल ४०० पेक्षा अधिक दुर्मिळ वनस्पतीचे जतन येथे केले जात असल्याचे डॉ. वानखडे यांनी सांगितले.
