कृषी क्षेत्राचा केवळ २५ टक्के वापर होतोय – डॉ. स्वामी

पुणे, दि. १६ – स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी भारताचे कृषी क्षेत्रातील वर्चस्व संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला. त्यात भर म्हणून नेहरुंनी इंग्रजांचा पगडा असलेली भारतीय कृषी निती पालटण्याऐवजी या क्षेत्रात `सोव्हियएत प्लॅनिंगम’ ही पद्धती अस्तित्वात आणत कृषी क्षेत्राचा कणाच मोडून टाकला, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केले. आजही कृषी क्षेत्राचा केवळ २५ टक्केच वापर केला जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजाभाऊ पोफळे, कार्याध्यक्ष सूर्यकांत पाठक, प्रांताध्यक्ष दिलीप फडके, श्रीकांत जोशी, अरुण देशपांडे, सोमनाथ खेडकर उपस्थित होते.
    स्वामी म्हणाले, स्वत:च्या कृषी क्षेत्रातल्या ताकदीविषयी भारतच अनभिज्ञ आहे. भारतातील वातावरण बाराही महिने शेतीस पोषक आहे, असे असतानाही आज भारतीय शेतीची स्थिती अतिशय बिकट आहे. दुसर्‍या हरितक्रांतीमुळे या क्षेत्राला थोडाफार दिलासा मिळाला. त्यानंतर आजतागायत कृषी क्षेत्राचा पूर्ण क्षमतेने वापर होत नसल्याची परिस्थिती आहे. मात्र, याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. कोणताही भौतिक विकास हा अध्यात्मिक समन्वयाशिवाय साध्य होऊच शकत नाही,  असेही ते म्हणाले.