महाराष्ट्रातील शहरी जीवनात जरी महापालिका निवडणुकांचे परिणाम आणि दररोज उजेडात येणारे भ्रष्टाचार यांची वृत्ते हे महत्वाचे विषय असले तरी ग्रामीण भागात दुष्काळ हाच अधिक परिणामकारक विषय आहे. या वेळच्या दुष्काळाचे वैशिष्ठ्य म्हणजे तो तसा फक्त साडेतीन महिन्याचा आहे. पण राज्यातील गरीब जनतेला वर्षभर सतावणारा झाला आहे कारण भीषण टंचाईला तीव्र महागाईची जोड मिळाली आहे.
प्रसारमाध्यमातून दुष्काळाच्या प्रतिबंधाच्या योजना येत असल्या तरी प्रत्यक्षात सामान्य माणसाला दूरदर्शनच आहे. दरवेळेला फक्त शासकीय पातळीवरील व्यवस्थापनातील दोष हे दुष्काळाची तीव्रता वाढायला कारणीभूत ठरते. पण यावेळी सत्तेत असणार्या दोन पक्षातील विसंवाद आणि एकमेकाला पराभूत करण्याची जाहीर योजना हे यामुळे त्याची तीव्रता अधिक वाढताना दिसत आहे.
यावर्षी महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी सरासरीयेवढा पाऊस पडला आहे. पावसाने सरासरी ओलांडलेल्या तालुक्यांची संख्या निम्म्यापेक्षा अधिक आहे. नेहेमीप्रमाणे ८४ तालुक्यात टंचाई आहे. गेल्या दिवाळीनंतर परतीचा मोसमी पाउस फिरकलाच नाही हे या दुष्काळाचे कारण आहे. गेल्या दहा वर्षानंतर परतीच्या पावसाने केलेला हा मोठा चमत्कार आहे. हा परतीचा पाउस म्हणजे दि. १ ऑक्टोबरनंतर पडणारा पाउस.
महाराष्ट्रात मोसमी पावसाचे दिवस हे १२० मानले जातात. दि.१ जून ते १ जुलै दरम्यान केरळपासून काश्मीरपर्यंत पोहोचणारा हा मोसमी पाउस दि. १ ऑक्टोबरदरम्यान परतीला आरंभ करतो. सार्या देशाचे भ्रमण करून आलेल्या या पावसाचे राज्यातच काय पण कोकणातही महत्व मानले जाते. वास्तविक महाराष्ट्रातील सारा मोसमी पाउस हा कोकणातून येतो आणि परतीचा पाउस हा उत्तरेकडून येतो. कारण तोच परतीचा पाउस असतो. पण त्याचे महत्व असे की तो स्वाती नक्षत्राचा असतो. त्याचे वाङमयातील स्थान काय असेल ते सांगता येणार नाही.
पण म्हणे समुद्रातील शिंपले त्या परतीच्या पावसाचा एखादा तरी थेंब आपल्याला मिळेल का म्हणून वाट बघत असतात. रात्रंदिवस आजूबाजूला सुरु असणार्या लांटांच्या तांडवातील पाण्याचे शिडकावे त्या शिंपल्यांना प्रसन्न करत नाहीत. पण मृग नक्षत्रात ढगांचे थवेच्या थवे खाली जमिनीवर थुईथुई पावसाचे सिंचन करत पुढे सरकत असतात. सार्या देशाचा प्रवास करून परतात तेंव्हा प्रत्येक ठिकाणी त्या थेंबाला मोत्याचे महत्व लाभते. महाराष्ट्रात याच पावसामुळे मोत्यासारखी रब्बीची ज्वारी मिळते. रब्बी हा शब्द सकृतदर्शनी रब या फारशी शब्दापासून आला आहे. रब म्हणजे परमेश्वर. रब्बीचे स्वरुपच ईश्वरीय असते. स्वाती नक्षत्रावर येणारा हा रब्बा यावेळी नाराज झाला होता त्यामुळे महाराष्ट्रही हिरमुसलेला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळाचा पारंपारिक पट्टा तोच यावर्षीचाही पट्टा आहे. फक्त स्थिती गंभीर आहे. सांगली जिल्ह्यात त्याची तीव्रता अधिक आहे. तेथे सध्या १५८ टँकर दररोज पिण्याचे पाणी पुरवत आहेत. तासगाव जत आणि कवठेमहांकाळ हे तालुके टंचाईग्रस्त आहेत. सातारा जिल्हयातील खटाव आण माण त्यांचा त्या यादीत समावेश होतो. येथे ११८ टँकर आहेत पुणे जिल्ह्यात ही संख्या ३५ आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यात ती संख्या दोन आहे. सोलापूर जिल्ह्यात सांगोला आणि मंगळवेढा हे दुष्काळग्रस्त तालुके आहेत.
या भागात एक निराळेच दुर्दैव पुढे आले आहे ते म्हणजे गेल्या तीन वर्षात या भागात लोकांनी बागाईत घेण्यास आरंभ केला आहे. काही भागात धोमचे पाणी आहे तर काही ठिकाणी जमिनीत खोलवर बोअर घेतले आहे. पण गेल्या तीन वर्षात उभी राहिलेली द्राक्षे, डाळिंब, अंजीर, पेरू, बोरे यांचा बागा सुकून गेल्या आहेत. या नुकसानीतून बाहेर येण्यास येथील तरुणांना अजून दोन वर्षे द्यावी लागतील. गेली दोन वर्षे माणदेशातून डाळिंबाची निर्यात होत होती. प्रामुख्याने मध्यपूर्वेत ही फळे चांगली किंमत द्यायची पण आता बागा सुकण्याचे प्रमाण फार मोठे आहे.उत्तर महाराष्ट्रात फळांच्या बागाईताचा विकास झाला आहे आता प्रथमच माणदेशात या बागा झाल्या होत्या. यावेळी उत्तर महाराष्ट्रातही दुष्काळ आहे. तेथे सिंदखेडा आणि साक्री हे तालुके अडचणीत सापडले आहेत. जळगावात १९१ गावांना झळ पोहोचली आहे. नाशिक जिल्ह्यात ७१ गावे व १६३ वाड्यावस्त्या या टंचाईग्रस्त आहेत.
सातारा जिल्ह्यात दुष्काळाच्या पाहणीसाठी आज केंद्रीय अभ्यास समिती येत आहे. केंद्रीय संयुक्त सचीव संजीव चोप्रा त्या समितीचे नेतृत्व करीत आहेत. सातार्याचे जिल्हाधिकारी डॉ. राधास्वामी यांनी जिल्ह्यातील कोरेगाव, फलटण, खंडाळा, माण व खटाव येथील बागांच्या नुकसानीसाठी दीडशे कोटी रुपयांची मागणी केली आहे. साताराजिल्ह्याचे यावेळचे वैशिष्ठ्य म्हणजे मुख्यमंत्री या जिल्ह्यातील आहेत आणि केंद्रीय कृषीमंत्र्यांचा मतदारसंघ या जिल्ह्यातील आहे. याच दोन महारथींच्या प्रतिनिधीत गेल्या आठवड्यात वादावादी झाली होती त्या वादावादीवर विस्मरणाचे पांघरूण पडावे म्हणून संजीव चोप्रा यांच्या नेतृत्वाखाली ही समिती आली आहे, असे बोलले जाते.
शिवसेनेच्या डॉ नीलम गोर्हे यांनी या आठवड्यात सातारा जिल्ह्याचा दौरा केला, त्यात त्यांचे म्हणणे असे की, नियोजनाचा अभाव ही या दुष्काळातील सर्वात मोठी समस्या आहे. त्याच प्रमाणे प्रत्येक ठिकाणी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस असे दोन्ही पक्षाचे उच्च पदाधिकारी असल्याने यशाच्या श्रेयाची कुरघोडी ही येथील दैनंदिनी समस्या झाली आहे. वास्तविक या भागात कृष्णानदीवरील टेंभू योजना आहे. कॉंग्रेस पक्षाचे येथे गेली पन्नास वर्षे सरकार असताना या भागाचा विकास कधीच जागचा हालला नाही पण पाच वर्षे युतीचे शासन असताना सार्या धरणाच्या बांधकामाला गती आली पण नंतर बारा वर्षात या आघाडीच्या सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. आजही टेंभू योजना अपूर्ण आहे.
या सार्या दुष्काळावर कृषीतज्ञ डॉ रामचंद्र साबळे यांचे म्हणणे असे की, गेल्या पन्नास वर्षातील हा अकरावा दुष्काळ आहे. प्रत्येक दुष्काळाच्या वेळी प्रचंड कामे झाल्याचे दिसते, पण त्याचा परिणाम आज पन्नास वर्षे टिकला आहे का, हे बघणे जरुरीचे आहे. पन्नास वर्षापूर्वी झालेल्या नालाबंडींचे आज काय झाले आहे हे बघणे गरजेचे आहे. माझ्या कल्पनेप्रमाणे यावर्षी विदर्भात टंचाईची गंभीर स्थिती आहे. तेथे साडेचार हजार गावे अडचणीत आहेत. पण त्यामानाने तिकडे काही पोहोचत नाही. पावसाचा अभ्यास ही तर सार्या महाराष्ट्राचीच गरज आहे. पण पाउस कमी की अधिक यापलिकडे फारचे काही होत नाही. पावसाची आता पूर्व कल्पना येऊ शकते त्याचा अंदाज घेतला, तर दुष्काळाचा अंदाज येतो. पण पिकाचे नुकसान होत नाही. आपल्याकडे दुष्काळाची कामे सुरु करणे म्हणजे नालाबंडींगचे कामे काढणे असे झाले आहे. पावसाची शक्यता यावर अभ्यास होणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील तरुणांनी त्यासाठी रस दाखवला पाहिजे.