सावकाराच्या जाचामुळे शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न

यवतमाळ, दि. १५ – झरी तालुक्यातील मकुटबन पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या अडकोली येथील शेतकर्‍याने अवैध सावकाराच्या जाचाला कंटाळून १३ एप्रिलला सायंकाळी ५ च्या सुमारास विष घेतले. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी या शेतकर्‍याला त्वरित चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविले. सध्या तो मृत्यूशी झुंज देत आहे. आत्महत्येच्या प्रयत्नापूर्वी या शेतकर्‍याने सावकाराच्या जाचाचा पाढा एका चिट्ठीत लिहून ठेवल्याने शेतकर्‍याच्या पत्नीने त्या सावकाराविरुद्ध मकुटबन पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
    या तक्रारीनुसार नथ्थू नानाजी बल्की यांनी मागील चार वर्षापासून नापिकी होत असल्याने महादेव काशिनाथ चवले या अवैध सावरकाराकडून दरमहा पाच टक्के व्याजदराने ४० हजार रुपये कर्ज घेतले होते. सावकाराने पीडित शेतकर्‍याच्या नावाने असलेली ३ एकर शेतजमीन या रकमेची हमी म्हणून ताब्यात घेतली. पैसे परत केल्यानंतर शेतजमीन परत करण्याचे तोंडी ठरले. हा व्यवहार गावातील चार लोकांच्या समक्ष झाला होता. बल्की यांनी त्याबद्दल ४० हजार व त्यावरील व्याज ३० हजार असे एकूण ७० हजार रुपये गावातील प्रभाकर बल्की यांच्या समक्ष सावकारास परत देण्याची सावकाराला वारंवार विनंती केली. परंतु सावकाराने नकार दिला. शेवटी `एकरी ५ लाख रुपये जमिनीची किंमत दिली तरच तुझ्या नावाने शेती होईल, नाहीतर तुला जे कराय ते कर,’  अशी धमकी सावकाराने दिली. त्यामुळे हादरलेल्या बल्की यांनी विष घेतले.