नागपूर, दि. १५ – उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन न करण्याचा निर्णय घेऊन प्राध्यापक आंदोलन करीत आहेत आणि त्यात निश्चितच विद्यार्थी भरडले जातील यात शंका नाही. मात्र, गेल्या २० वर्षांपासून शिक्षक संघटना त्यांच्या हक्कासाठी लढत असताना शासन त्याची दखल घेत नसल्याने नाईलाजाने आंदोलनाचे पाऊल उचलावे लागल्याचे नागपूर विद्यापीठ शिक्षक संघटनेचे सचिव डॉ. अनिल ढगे यांनी सांगितले.
विद्यापीठ अनुदान आयोग, महाराष्ट्र शासन आणि विद्यापीठांनी वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांचीच पूर्तता व्हावी, एवढेच आमचे म्हणणे आहे. मात्र नोकरशाही मंत्र्यांना भारी पडत असून त्यांच्या खोडसाळपणामुळेच गेल्या कित्येक वर्षापासून प्राध्यापकांना त्यांचे हक्क प्राप्त होऊ शकले नाहीत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांचा आमच्या मागण्यांना पाठिंबा आहे. मात्र त्यांच्या कार्यालयातील कनिष्ठ दर्जाचे अधिकारीच खोडसाळपणा करून हे काम पूर्णत्वास जावू देत नाहीत, असे डॉ. ढगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या आवाहनानुसार प्राध्यापक १६ एप्रिलला जेलभरो आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
