
विजापूर, दि.१४ – कर्नाटक राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता, राज्य सरकारने राज्यातील सर्व शेतकर्यांची कर्जे माफ केली पाहिजेत, असे मत कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते सिध्दरामय्यांनी व्यक्त केले. शुक्रवारी त्यांनी विजापूरला भेट दिली. त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, शेतकर्यांची कर्जे माफ केल्यामुळे सरकारला २५०० कोटींचे नुकसान होऊ शकते. परंतु त्यामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटणार नाही. शेतकर्यांसाठी वेगळे कृषी बजेट तयार करण्यापेक्षा शेतकर्यांचे कर्ज माफ करावे. सध्याचे मुख्यमंत्री आपली खुर्ची सांभाळण्यासाठी धडपडत आहेत, त्यांनी शेतकर्यांच्या समस्येकडे लक्ष द्यावे, असा टोलाही सिध्दरामय्यांनी हाणला.
राज्यात यावर्षी दुष्काळ पडल्यामुळे ४६०० कोटी रुपयांच्या पिकांची हानी झाली आहे, असे शासकीय अहवालात नमूद केले आहे. परंतु शेतकर्यांना अजुन नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही. केंद्र सरकारने १६९ कोटी रुपयांचा निधी दिला आहे, परंतु हा निधी सुध्दा संपूर्ण वापरण्यात आलेला नाही.
विजापूर जिल्हयात भीषण पाणी टंचाई आहे. जनावरांना चारा नाही. परंतु सरकारने फक्त १० ठिकाणी चारा डेपो सुरु केला आहे. प्रत्येक तालुक्यात किमान १० ठिकाणी चारा डेपोची गरज आहे. विजापूर जिल्हयातील द्राक्ष पिके वाळून गेली आहेत. जिल्हयात दरवर्षी १५ हजार एकर जमीनीवर द्राक्षे पिकविली जातात. दुष्काळामुळे यंदाचे वर्षी फक्त ३ हजार एकर जमिनीवर द्राक्षे पिकली आहेत. दुष्काळी परिस्थितीशी सामना करण्यात राज्य सरकार पिकल झाले आहे, अशा सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी सिध्दरामय्यांनी केली. या पत्रकार परिषदेत माजी मंत्री जयचंद्र, विधान परिषद सदस्य एस. आर. पाटील यांनीही भाग घेतला.
