मुंबई, दि. १४ – मुंबई व पश्चिम महाराष्ट्रासह गुजरातच्या काही भागात शनिवारी सकाळी भूकंपाचा सौम्य धक्के जाणवले. सकाळी १०.५८ च्या सुमारास झालेल्या या भूकंपाची तीव्रता ४.९ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून १० किमी अंतरावर गोशतवाडी गावाजवळ असल्याचे समजते. राज्याची राजधानी मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी भूकंपाचा सौम्य कंपने जाणवल्यामुळे परिसरात घबराट पसरली. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर व चिपळूण शहरांमध्ये काही मातीच्या घरांना तडे गेल्याचे वृत्त मिळाले असले, तरी कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही.
गुजरातमध्ये देखील शनिवारी सकाळी ८.५३ च्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. गुजरातमधील कच्छ भागात या भूकंपाचे केंद्र असून, या भूकंपाची तीव्रता ४ रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली. महाराष्ट्र आणि गुजरातसोबतच कर्नाटकच्या गुलबर्गा आणि बेळगावमध्येही भूकंपाचे सौम्य पडसाद उमटले.
या आठवड्यात राज्याला जाणवलेला हा दुसरा भूकंप आहे. बुधवारी इंडोनेशियानजिक झालेल्या भूकंपामुळे भारताच्या पूर्व किनार्यावर अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला होता. मात्र नंतर इंडोनेशिया व भारतीय अपत्कालीन यंत्रणेने त्सुनामीची शक्यता नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते.
