दुष्काळाचा सामना करण्यासाठी सर्वपक्षीय समितीची मागणी

कर्नाटक, दि. १३ – कर्नाटक राज्यातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये सर्वपक्षीय समितीची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री कुमार स्वामी यांनी केली आहे. विजापूर जिल्हयातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी गुरुवार १२ एप्रिल रोजी कुमारस्वामीनी विजापूर दौरा केला. त्यावेळी त्यांनी पत्रकारांना सांगितले की, राज्यातील १२३ तालुके दुष्काळग्रस्त आहेत. त्यांना मदत करण्यासाठी सरकारने सर्वपक्षीय समितीची रचना करावी. कारण निधी उपलब्ध असताना, गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचत नाही, अशा तक्रारी येत आहेत. प्रशासकीय अधिकारी दुर्लक्ष करतात त्यामुळे सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि नागरिकांचे प्रतिनिधी यांची सर्वपक्षीय समिती बनवावी. त्यामुळे सरकारी मदतीचे वाटप योग्य रितीने होईल व कोणाचीही तक्रार येणार नाही.
पावसाच्या अभावामुळे राज्याचे ४,५०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल केंद्र सरकारकडे राज्याचा दौरा नुकताच पूर्ण केला आहे. हे अनुदान मिळविण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत. तसेच सध्या जो निधी उपलब्ध आहे, त्यामधून पिण्याचे पाणी, चारा यांची व्यवस्था करावी. विजापूर जिल्हयातील १०८ तलाव भरण्यासाठी कायम स्वरुपी योजना तयार करावी. आलमही येथील धरणाकरिता विजापूर जिल्हयातील शेतकर्‍यांनी मोठा त्याग केला आहे. त्यामुळे या या परिसरातील सिंचन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावेत. अशीही कुमार स्वामीनी मागणी केली.