सलमानखानच्या प्रेरणेमुळेच बॉनी कपूरचा मुलगा बनला `इश्कजादा’

मुंबई, दि. १३  –  `इश्कजादे’ या चित्रपटातून बॉनी कपूरचा मुलगा अर्जुन कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. या नवोदित कलाकाराला सलनाम कॅम्पची खूपच मदत झाली आहे. तसेच सलमान व त्याच्या कॅम्पच्या इतर मंडळींनी अर्जुनला केलेल्या मदतीची चर्चा होत आहे. अर्जुनच्या बॉलिवूडमधील प्रवेशामागे सलमान आणि त्याच्या कॅम्पचा खूप हातभार आहे.
    अर्जुनला अभिनेता होण्यापेक्षा दिग्दर्शक व्हायचे होते आणि त्यासाठी त्याचे प्रयत्न सुद्धा सुरू होते. त्याने काही चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून देखील काम केले आहे. तसेच सलमान खानच्या `वॉन्टेड’ चित्रपटात अर्जुन प्रभूदेवाचे सहाय्यक दिग्दर्शक होते. त्यावेळीच सलमानने त्याच्यातील अभिनयाची समज हेरली आणि अर्जुनला अभिनेता होण्याचा सल्ला दिला. सलमानखानने त्याला तुझी जागा पडद्यामागे नसून पडद्यासमोर आहे असे सांगून त्याला प्रोत्साहित केले. विशेष म्हणजे त्यावेळी अर्जुनचे वजन १५० किलो होते. त्यामुळे सलमानने त्याला आपले वजन कमी करण्याचा सल्ला देऊन, अभिनयाच्या सुद्धा काही सूचना केल्या.
    अर्जुन पूर्वी सलमानची बहिण अर्पिता हिच्याची सूत जुळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही चित्रपटसृष्टीत बोलले जाते. पण केवळ एवढ्याच कारणाने सलमानने अर्जुनला मदत केली असे नाही. कारण यापूर्वी सोनाक्षी सिन्हाच्या बॉलिवूडमधील पदार्पणात सलमाननेच तिला मदत केली होती. सोनाक्षीला फॅशन डिझायनर बनायचे होते. परंतु सलमानने तिला ` दबंग ‘ मध्ये घेऊन फिल्म इंडस्ट्रीला नवीन चेहरा दिला. सलमानने इंडस्ट्रीला असे अनेक नवीन चेहरे दिले आहेत. `कहो ना प्यार है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार्‍या ह्रतिक रोशनला फिट राहण्याचा सल्लादेखील सलमाननेच दिला होता. त्यानंतर या चित्रपटातून पदार्पण केलेल्या ह्रतिकने आपल्या शरीरयष्टीने अनेकींना घायाळ केल्याचा इतिहास आपल्याला माहीत आहेच.