वितरण व्यवस्थेतील विलंबामुळे शेतकरी त्रस्त संगणकीकृत सातबारा उतार्‍यासाठी मनुष्यबळाचा अभाव

कोल्हापूर, दि. १२ – शेतकर्‍यांच्या दैनंदिन उपयोगात येणार्‍या ७/१२ साठी शिरोळ तहसील कार्यालयातील सेतू केंद्रावर शेतकर्‍यांची मानसिक, आर्थिक पिळवणूक केली जात आहे. अशी फरफट होत असताना शेतकर्‍यांच्या तोंडून सेतूपेक्षा तलाठीच बरा असा सूर निघत आहे. संगणकीकृत सातबारा वितरण प्रणालीने ग्रामीण शेतकरी कमालीचा त्रस्त झाला आहे. संगणकीकृत सातबारा उतारे यंत्रणा कार्यरत करण्यासाठी आवश्यक ते कुशल मनुष्यबळ नसल्याने हा विलंब लागत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात अनेक चांगल्या गोष्टी कालबाह्य होत चालल्या आहेत.
    पूर्वी कार्यालयीन कामकाजात लिपिकांचा प्रभाव असायचा, त्यावेळी संगणकासारखी साधने नसल्याने सर्व कारभार पेन व कागदावरच चालायचा. तरी देखील जलदगतीने कामे करुन देण्याची प्रामाणिक इच्छा लिपीक कारकुनांची असायची आता प्रत्येक कार्यालयात संगणकाने जागा घेतली असून लागणारे प्रमाणपत्र,  दाखलेसुध्दा संगणकीकृत केलेले मिळत आहेत. शेतकर्‍यांना दारातच मोफत सातबाराही देण्याची घोषणा महसूल विभागाने केली होती. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळेल असेही वाटत होते. शेतकरी वर्गाला प्रत्येक कामात उपयोगी पडणार्‍या सातबार्‍यासाठी तलाठ्याऐवजी सेतू केंद्रावर रांगा लावाव्या लागत आहेत. त्यासाठी दामदुप्पटपणे केंद्रातून पैसेही उकळले जात आहे. त्यामुळे खेड्यापाड्यातील अधिक संकटाने गांजलेला शेतकरी सेतूपेक्षा तलाठीच बरा अशी चर्चा करताना दिसत आहे.
    तलाठ्यांना सातबारा देण्यास महसूल विभागाने बंधने लादली असून भूमीपुत्र शेतकर्‍यांना मात्र ही कर्मचारी मंडळी त्रस्त करुन सोडत आहेत. कृषी व्यवस्थेत तलाठी हा महत्वाचा दुवा असून शेतकर्‍यांचे सर्व दप्तरे सांभाळणारा महसूल विभागाचा कर्मचारी आहे. गाव तेथे तलाठी कार्यालय ही संकल्पना असून शेतकर्‍यांना सहजपणे लागणारी प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्याच्या शासकीय सूचना आहेत, असे असताना शेतकर्‍याला जागोजागी लुबाडणार्‍या शासकीय व्यवस्थेतील काही अधिकारी कर्मचार्‍यांनी प्रमाणपत्र वितरण प्रक्रीयेत अनेक अटी लादल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांनी गावातच तलाठ्यांकडून सातबारा मिळावा, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.