नेते जमिनीवरचे आणि हवेतले

काँग्रेस पक्षात सध्या आत्मपरीक्षणाचे पर्व सुरू झाले आहे. आपला उत्तर प्रदेशासह तीन राज्यांतल्या विधानसभा निवडणुकांत पराभव का झाला याचा शोध घेण्याचे सत्र सुरू झाले आहे. पंजाब, गोवा आणि उत्तर प्रदेशात काँग्रेसचा पराभव झाला आहे. तेव्हा या पराभवामागची कारणे काय आहेत याचा तपास करण्याचे हे प्रयत्न आहेत.

पराभवानंतर असे आत्मपरीक्षण केलेच पाहिजे पण विजयानंतरही असे आत्मपरीक्षण होण्याची गरज असते. कारण निवडणुकीतला विजय काही वेळा आपल्या कर्तबगारीपेक्षा विरोधकांच्या काही दोषांमुळे आपल्याला आयताच मिळालेला असतो. विजय मिळाला याचा अर्थ आपले सारे काही छान होते असा होत नाही. असा विजय मिळाला असला तरीही त्यात आपल्या अनेक  त्रुटी राहून गलेल्या असतात आणि विजयानंतरही आत्मपरीक्षण करण्याने या त्रुटी तसेच त्यातून दिसलेल्या आपल्या मर्यादा आपल्याला स्पष्ट दिसत असतात.

म्हणून पराभवानंतर आत्मपरीक्षण केले पाहिजे. ते आत्मपरीक्षण पराभवाकडून विजयाकडे वाटचाल करायला उपयोगी पडत असते. तसेच विजयानंतरही आत्मपरीक्षण केले पाहिजे. ते आत्मपरीक्षण आपल्याला विजयाकडून अधिक पक्क्या  विजयाकडे अशी वाटचाल करावी याचे मार्गदर्शन करीत असते. आता राहुल गांधी तीन राज्यांतल्या पराभवाचे विश्लेषण करीत आहेत पण ते उत्तराखंडातल्या विजयाचे विश्लेषण करायला तयार नाहीत कारण विजयानंतर कसले आत्मपरीक्षण करायचे असते हेच त्यांना माहीत नाही. उत्तराखंडातला काँग्रेसचा विजय काठावरचा आहे.

तो काँग्रेसच्या कर्तबगारीपेक्षा भाजपातल्या गटबाजीमुळे मिळाला आहे. भाजपाचे बडतर्फ मुख्यमंत्री रमेश पोखरीयाल यांनी विद्यमान मुख्यमंत्री भुवनचंद्रा खंडुरी यांना पराभूत करण्याच्या कारवाया केल्या नसत्या आणि खंडुरी निवडून आले असते तर तिथे काँग्रेसला सत्ता मिळाली नसती. तिथला काँग्रेसचा विजय पोखरीयाल यांच्यामुळे झाला आहे. अर्थात अशी गोष्ट केवळ काँग्रेसच्या बाबतीत आणि केवळ उत्तराखंडातच घडते असे नाही.

अन्यत्रही घडत असते. विशेषतः भारतीय जनता पार्टीला अनेक ठिकाणी काँग्रेसमधल्या गटबाजीमुळे सत्ता मिळते. या विजयाच्या कैफात ते आपल्या विजयाचे योग्य ते विश्लेषण करीत नाहीत म्हणून त्यांना आपल्या त्या अपघाताने मिळालेल्या यशाचे रूपांतर चिरस्थायी विजयात करता येत नाही. असे विजयातही आत्मपरीक्षण करायचे असते हे भाजपाच्याही नेत्यांना माहीत नाही तसे ते काँग्रेसच्याही नेत्यांना माहीत नाही.

ते माहीत नसल्यामुळेच त्यांना पराभवाचे विश्लेषणही निर्दोषपणे करता येत नाही. त्यांना बिहार आणि तामिळनाडू या दोन राज्यात झालेल्या दारुण पराभवातून मार्ग काढता आलेला नाही. या दोन्ही राज्यांत काँग्रेसने राहुल गांधी यांना पुढे केले होते. तरीही त्यांना काँग्रेससाठी तिथे पाचपेक्षा अधिक जागा मिळवता आल्या नाहीत. याचा अर्थ उघड आहे की काँग्रेस पक्षाला राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचा काहीही लाभ होत नाही.

दोन अनुभव पदरात असतानाही काँग्रेस पक्षाने पुन्हा उत्तर प्रदेशातही राहुल गांधी यांनाच मैदानात उतरवले. मग या दोन राज्यातल्या पराभवापासून त्यांनी काय धडा घेतला ? आता जे आत्मपरीक्षण सुरू आहे त्यात राहुल गांधी अनेक पराभूत उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. त्यातला एक तरी उमेदवार धाडस करून हे सांगणार आहे का ? पक्षाच्या पराभवाला तुमचेच कळाहीन नेतृत्व जबाबदार आहे तेव्हा तुम्ही बाजूला सरका आणि घराणेशाही बंद करून पक्षाला नवे नेतृत्व द्या असे म्हणण्याचे साहस कोणी तरी करणार आहे का ? तसे धाडस कोणी करणार नाही.

त्यामुळे काँग्रेसची वाटचाल अधोगती कडून अधिक अधोगतीकडे होणार आहे. पण या वस्तुस्थितीचे भान नसणार्‍या राहुल गांधी यांनी, आपण यँव चालू देणार नाही, त्यँव चालू देणार नाही अशा वल्गना करायला सुरूवात केली आहे. आपल्या या वल्गना किती निरर्थक आणि हास्यास्पद आहेत याची त्यांना थोडीशीही जाणीव नाही. आता त्यांनी आपल्याला हवेतले नेते चालणार नाहीत, जमिनीवरचे नेते चालतील असे म्हटले आहे.

खरे तर हा सारा शब्दांचा खेळ आहे. या खेळाला संघटनात्मक वस्तुस्थितीचा थोडासाही आधार नाही. यातले हवेतले नेते म्हणजे नेमके काय आणि जमिनीवरचे नेते म्हणजे नेमके काय असा प्रश्न विचारला तर राहुल गांधी यांना कसलेच उत्तर देता येणार नाही. मग हवेतले नेते म्हणून नेमके कोणाला दूर सारणार आणि जमिनीवरचे नेते म्हणून कोणाला जवळ करणार याचा तर खुलासा त्यांना करताच यायचा नाही. असा कसला खुलासा त्यांनी आपल्या मनाशी तयारही केलेला नसेल कारण त्यांना तसे काही करायचेच नाही. त्यांच्या डोळ्यासमोर संघटनात्मक पुनर्रचनेचा कसलाही निश्चित स्वरूपाचा आराखडाच तयार नाही. आपण पराभवातून काही तरी धडा शिकत आहोत आणि पक्षाला विजय मिळवण्यासाठी काही तरी पावले टाकत आहोत असे भ्रामक चित्र निर्माण करण्याची त्यांची ही दिशाहीन धडपड जारी आहे.