
मुंबई, दि. १० – देशभरातील सराफांनी पुकारलेला संप नुकताच मागे घेण्यात आला. संपाच्या काळात सोन्याच्या व्यापार्यांकडून कोणतीही सोने खरेदी झालेली नाही. सराफांकडे सोन्याचा पुरेसा साठा असल्याने संप संपल्यानंतर सोने खरेदी मोठ्या प्रमाणावर होईल असे सराफांना वाटत नाही. परिणामी, सोन्याच्या आयातीत लक्षणीय वाढ दिसून येणार नाही.
संपकाळात दागिने घडविणे पूर्णपणे बंद होते. त्यामुळे वापराविना ५ ते १० टन सोने पडून राहिले. संप संपल्यामुळे आता हे सोने प्राधान्याने दागिने घडविण्यासाठी वापरले जाईल, त्यामुळे आयातीत वाढ होणार नाही. लग्नसराईचा मोसम नुकताच सुरू झाला असल्याने आता संपानंतर दागिन्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी कारागिरांवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. संपाच्या काळात आयात ५६ टक्क्यांनी कमी झाली. या काळात फक्त १२५ टन सोने आयात केले गेले.
