
टायटानिक या जगप्रसिद्ध बोटीच्या दुर्घटनेला यंदा १४एप्रिल २०१२ रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. युनेस्कोने प्रोटेक्शन ऑफ अंडरवॉटर कल्चरल हेरिटेज करार २०११ नुसार टायटानिक हा जागतिक वारसा म्हणून जतन करण्याचे ठरविले आहे. ज्या वस्तू बुडून शंभर वर्षांचा अथवा त्यापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे त्यासाठीच हा करार लागू होऊ शकतो असे समजते.
टायटानिक ही महाकाय, विशाल, अतिशय देखणी आणि जगातील उत्तमोत्तम सोयीसुविधांनी परिपूर्ण अशी बोट आपल्या पहिल्या प्रवासाला ब्रिटीश पोर्ट साऊथंम्पटन येथून १० एप्रिल १९१२ ला निघाली. युरोप ते यूएस अशा दीर्घ प्रवासाचा या बोटीचा हा पहिला प्रवास अखेरचा प्रवास ठरला. अटलांटिक समुद्रात अगदी पहाटे १४ एप्रिलला ही बोट एका हिमनगाला धडकली आणि जगातील सर्वात मोठी शोकांतिका घडली. २२०० प्रवाशांसकट मोठ्या दिमाखात आपल्या पहिल्या सफरीवर निघालेल्या या बोटीतील १४९६ प्रवासी ठार झाले पैकी फक्त ३०६च मृतदेह हाती लागू शकले. ७०६ जणांचे प्राण वाचविण्यात यश आले. ज्या भागात ही बोट बुडाली तो आंतरराष्ट्रीय हद्दीचा भाग होता व त्यामुळे कोणत्याच देशाला वा राज्याला अपघाताची जबाबदारी घेता आली नाही. मात्र त्यानंतर या बुडालेल्या बोटीतील सामान व अन्य वस्तू शोधण्यासाठी अनेकांनी परवानग्या घेऊन बोटीचा शोध घेतला अनेक दुर्मिळ, मौल्यवान वस्तू विकल्याही गेल्या.
आता मात्र युनेस्कोच्या करारानुसार ही बोट जागतिक वारसा म्हणून ओळखली जाणार असल्याने या बोटीचे नुकसान करणे, त्यातील सामानाची लूट अथवा विक्री करणे कायद्यानेच बंद होणार आहे. तसेच आता यापुढे या बोटीतील मृतांच्या ज्या वस्तू अथवा अन्य कांही गोष्टी सापडतील त्या योग्य सन्मानाने सांभाळल्या जाणार आहेत.
