जनतेचे हित हवे तर राजकारण – समाजकारणाचा सांधा जोडणे गरजेचे- भंडारी

पुणे,दि.३-प्रतिनिधी- राजकारणाचा समाजकारणाशी सतत सांधा जोडला तरच राजकारण हे जनतेच्या हिताचे होते अन्यथा राजकारण हे सतत भ्रष्ट होण्याचीच शक्यता असते, असे भारतीय जनतापक्षाचे प्रदेश प्रवक्ते श्री माधव भंडारी यांनी पुण्यात पुणे मराठी ग्रंथालयात ‘रामभाउ म्हाळगी ’ पुण्यस्मरण भाषणमालेत बोलताना सांगितले.
    ते म्हणाले, भारतात लोकशाहीच्या प्रयोगाला यावर्षी पंचाहत्तर वर्षे होत आहेत. स्वातंत्र्यापूर्वी दहा वर्षे म्हणजे १९३७ साली ब्रिटिशांनी देशभर स्थानिक लोकप्रतिनिधींची सरकारे स्थापली होती. ती बहुतांशी काँग्रेसची होती.पण त्या सरकारामधून येवढ्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होऊ लागला की, महात्माजींनी उपोषण करून ती सरकारातील लोकांना राजीनामा देण्यास भाग पाडले. त्या वेळच्या लोकप्रतिनिधींना सामाजिक चळवळीची आणि स्वातंत्र्यचळवळीची पाश्र्वभूमी होती ‘तरीही सत्ता ही स्वार्थाकडे नेते’ असाच अनुभव आहे. राजकारण हे सतत सामाजिक चळवळीशी संबंधित असायला हवे.
    गेल्या पासष्ट वर्षाचा इतिहासातील घटनांचा आढावा घेताना श्री भंडारी म्हणाले, स्वातंत्र्यांनंतरची पहिली पंचवीस वर्षे ही स्वातंत्र्य मिळाल्याच्या समाधानानंतरची होती त्यामुळे प्रयोगशीलता, तुलनात्मक दृष्टीने स्वार्थाचा फारसा प्रभाव नसणे याचे दर्शन होत होते. पण १९७१ नंतर इंदिराबाईंना आपल्या एकमेवाद्वितीयत्वाचे दर्शन घडविण्याची प्रबळ इच्छा झाली व त्यांनी काँग्रेसमधीलही अन्य मोठया नेत्यांना डावलून आपले सरकार आणले.त्यातूनच समाजकारण हे राजकारणापासून दूर गेले. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हेच जणू परवलीचे शब्द झाले. बिहारमध्ये त्यावेळचे मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांनी रा.स्व.संघाचे सरसंघचालक श्रीगोळवळकर गुरुजी याना बिहारमध्ये प्रवेश करतानाच अटक केली. त्याचा राजकारणावर मोठा प्रभाव झाला. युवासंघटनांनी देश बंदची घोषणा केली. इंदिराजींना मध्यस्थी करून श्रीगुरुजींची मुक्तता करण्यास भाग पडले. पण त्यामुळे भ्रष्टाचार, महागाई आणि बेरोजगारी हे विषय येवढ्या मोठ्या प्रमाणात पुढे आले की, बिहार व गुजरातमध्ये नवनिर्माणाची चळवळ उभी राहिली. जयप्रकाश नारायण यांनी त्या पूर्वी पंचवीस वर्षापूर्वी म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राजकारण संन्यास घेतला होता तो राजकारण संन्यास मागे घेऊन संपूर्ण क्रांतीची घोषणा केली. त्याचा परिणामही झाला. त्यातून निर्माण झालेला जनतापक्ष फारकाळ काम करू शकला नाही पण भारतीय जनता पक्षांने आपल्या निष्ठा सांभाळल्या व राजकारणात ठामपणे उभे राहण्याचे ठरविले. जनता पक्षाची पाश्र्वभूमी असलेला केवळ भारतीय जनता पक्षच ठामपणे उभा आहे. तरीही अजून काँग्रेसची भ्रष्टाचार, बेकारी आणि महागाई हया समस्या सतत वाढत ठेवणारी सत्ता जावू शकलेली नाही त्यासाठी राजकारणाला समाजकारणाची जोड देणे आवश्यक आहे. राजकारणात तो प्रयोग वारंवार अयशस्वी होत असतो तरीही तो वारंवार करावा लागतो. आजही तो नव्या दमाने करण्याची गरज आहे.
    या कार्यक्रमाला भाजपाचे शहर अध्यक्ष प्रा. विकास मटकरी, पुणे मराठी ग्रंथालयाचे अध्यक्ष मोहन दाते, कार्यवाह मुकुंद अनगळ उपस्थित होते.
        ————————————————