नागपूर, दि. २ – भारतीय संस्कृती भक्तिला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या भक्तियुक्त ज्ञान, कर्माचा आविष्कार राष्ट्रीय जीवनात होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. चितामणी अथर्वशीर्ष मंडळातर्फे गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान नित्य प्रभातफेरीचा उपक्रम सलग १५ वर्षांपासून सुरु आहे.या प्रभातफेरीचा समारोप व भव्य मिरवणुकीतील पालखी व पंचायतनाचे पूजन डॉ. भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मोहिते भागसंघचालक अशोक भट, मोहिते नगर संघचालक डॉ. दिलीप सेनाड, केंद्रीय कार्यालय प्रमुख हरिश सायरे, नगर कार्यवाह संजय आंबेकर, महापौर अनिल सोले, नगरसेवक बंडू राऊत, रश्मी फडणवीस उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना डॉ. भागवत म्हणाले की, कोणत्याही उपक्रमात भक्तीचे अधिष्ठान असणे आवश्यक आहे. मुळात रामाची भक्तीही राष्ट्रभक्तीचीच आहे. आपल्याकडे देव व माणूस निराळा कधीच नव्हता. प्रत्येकामध्ये तो विराजमान आहे, प्रत्येकाच्या हृदयातून तो प्रकट व्हावा तसेच भक्तियुक्त ज्ञान व कर्माचा आविष्कार साठाउत्तरी सुफळ व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करीत. मुळात सर्वांच्या इच्छेनुसार संघाचे काम चालविण्याचे दायीपण आम्ही स्वीकारले आहे, असे सांगत कल्याणकारी उपक्रम यशस्वी व्हावे अशी सदिच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
