नागपूर, दि.२ – गडचिरोली जिल्हयात नक्षलवाद्यांनी नुकत्याच केलेल्या स्फोटात १२ जवान शहीद झाले तर अन्य अनेक जण जखमी झाले. यानंतर राज्याचे गृहमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी आदिवासी बटालियन उभारून नक्षलवादाचा सामना करण्याची घोषणा केली. यावर अॅकॅडमी ऑफ न्युट्रिशन इम्प्रुव्हमेंटचे अध्यक्ष डॉ. शांतीलाल कोठारी यांनी बटालियन उभी करण्याने समस्येचे निराकरण होणार नसून समस्या अधिक गंभीर मात्र निश्चितपणे होईल, असे स्पष्ट म्हटले आहे.
यासंदर्भात त्यांनी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांना लिहिलेल्या पत्रात ही बाब स्पष्ट केली आहे. ग्रामसभांना त्यांच्या नजीक असलेल्या नैसर्गिक संसाधनांचा उपयोग करण्याचा अधिकार देऊनच नक्षलवाद, बेरोजगारी व कुपोषणासारख्या समस्यांचे निराकरण करता येईल, या जयराम रमेश यांच्या मताचे डॉ. कोठारी यांनी स्वागतही केले आहे. डॉ. कोठारींच्या मते नक्षलग्रस्त भागातील लोकांना नैसर्गिक संसाधनांचा वापर करण्याचा तसेच विकास करण्याचा अधिकार दिल्यास हे लोक स्वतःचा विकास तर करतीलच पण त्याचबरोबर देशाच्या विकासातदेखील त्यांची फार मोठी मदत होऊ शकेल. गडचिरोली जिल्ह्यातील सात गावांमध्ये लागू करण्यात आलेली योजना संपूर्ण देशातच लागू करावी, असेही डॉ. कोठारी यांनी म्हटले आहे.
