नवी दिल्ली, दि. ३० – टाटा ट्रकशी करार करण्यासाठी लष्करप्रमुखांना लाच देऊ केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी देशाचे संरक्षण मंत्री ऐ. के. अँटनी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दोन वर्षांपूर्वी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले होते. मात्र अद्याप सरकारतर्फे कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे देशाचे संरक्षण मंत्रीच भ्रष्टाचाराला उत्तेजन देत असल्याचे दिसून येत आहे, असे भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी राज्यसभेत सांगितले.
टाटा ट्रक प्रकरणाची चौकशी २००९ सालापासून आतापर्यंत सुरु आहे. दोन वर्षांच्या कालावधीत सरकारला या प्रकरणाची चौकशी योग्य प्रकारे करता आलेली नाही. त्यामुळे सरकार आणि संरक्षण मंत्री ट्रक खरेदीत झालेला भ्रष्टाचार लपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. जर सरकारनेच भ्रष्टाचारावर पांघरूण घातले तर त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे अँटोनी यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी जावडेकर यांनी केली.
केंद्रीय आरोग्य मंत्री गुलाम नबी आझाद यांनी दोन वर्षांपूर्वी सदर प्रकरणाची चौकशी करण्याबाबतचे पत्र संरक्षण मंत्र्यांना लिहिले होते. त्यावेळेस चौकशी सुरु असल्याचे संरक्षण मंत्र्यांनी त्यांना कळविले होते. मात्र त्यांनी चौकशीत हाती लागलेली माहिती जाहीर करण्याची मागणी केली होती, असे भाजपने सांगितले. दरम्यान, या प्रकरणात केलेली कारवाई आणि आरोपींचे नाव सभागृहाला सांगण्याची मागणी जावडेकर यांनी यावेळी केली.
