नक्षलवाद्यांनी पाच वर्षात केले १२ स्फोट

नागपूर, दि.२९ – गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी मंगळवारी पुन्हा एकदा भू-सुरुंगस्फोट घडवून १२ जवानांचे प्राण घेतले. नक्षलवाद्यांनी घडवून आणलेला या वर्षीचा पहिला स्फोट असला तरी गेल्या पाच वर्षाच्या कालावधीतील हा सर्वात मोठा सुरुंगस्फोट आहे. जानेवारी २००८ ते मार्च २०१२ या पाच वर्षात नक्षल्यांनी १२ स्फोट घडवून आणले. त्यातून सहा नागरिकासह ३९ जणांची बळी घेतले आहे.
  गडचिरोलीच्या हिरव्यागार घनदाट जंगलात २००७ पासून नक्षल्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यांनी येथे सैन्याच्या धर्तीवर अत्याधुनिक प्रशिक्षणतळ निर्माण करुन खडतर प्रशिक्षणही देणे सुरु केले. स्थानिक बेरोजगारांची डोकी भडकवून नक्षल चळवळीत सहभागी करुन घेतल्यानंतर त्यांना बंदुका, दारुगोळा, हाताळण्याचे तसेच भू-सुरुंगस्फोट घडवून आणण्याचेही प्रशिक्षण देण्यात आले. या पार्श्वभूमीवर २००८ पासून स्फोटात वाहने उडवून जवानांच्या चिंधड्या उडविण्याचे प्रकार नक्षलवाद्यांनी सुरु केले आहे. १७ जानेवारी २००८ ला नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात स्फोट घडविला. तो फुसका बार निघाला. त्यात केवळ एक पोलिस जखमी झाला. आणि स्फोट घडविणारा एक नक्षलवादीही ठार झाला. त्यानंतर दुसरा स्फोट २० मार्चला गडेरी – कसरसूरजवळ घडवत नक्षल्यांनी पाच जणाचें बळी घेतले. आठ जणांना जबर जखमी केले.
  सन २००९ मध्ये घडवून आणलेल्या दोन स्फोटांपैकी धानोराजवळचा १७ एप्रिलचा स्फोट वाया गेला.११ नोव्हेंबरच्या स्फोटात तीन जबर जखमी झालेत. २०१० मध्ये गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात सीआरसीएफच्या कंपन्या पोहोचल्या. नक्षलविरोधी अभियानही तीव्र झाले. त्यामुळे नक्षल्यांचे पित्त खवळले. त्यांनी यावर्षी चार स्फोट घडवून आणले. ४ ऑक्टोबरच्या पेरिमलीजवळच्या स्फोटात दोन अधिकारी आणि दोन जवान असे चार जण शहीद झाले, तर आठ जवान जखमी झाले. त्यानंतर ८ ऑक्टोबरला नक्षल्यांनी सावरगावजळ एकाच दिवशी दोन स्फोट घडवून ११ जणांचे बळी घेतले. या स्फोटात १४ जण जखमी झाले होते.
  यानंतर १५ जानेवारी २०११ ला इरखेडला स्फोट करुन दोघांना जखमी केले. या स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणांनी नक्षलवाद्यांविरुद्ध आक्रमक कारवाया सुरु केल्या.