सोलापूर, दि. २९ – यंदाच्या वर्षी जिल्हयातील काही तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यन्त कमी असल्याने चारा टंचाई जाणवत आहे. मंगळवेढा व सांगोला या दोन तालुक्यात चार्याची भीषण टंचाई जाणवत असल्याने या तालुक्यातील चारा जिल्हयाबाहेर नेण्यास बंदी घालण्याचा निर्णय जिल्हाधिकारी गोकूळ मवारे यांनी घेतला असून ३० जूनपर्यंत चारा वाहतुकीवर जिल्हाबंदी राहणार आहे.
यंदाच्या वर्षी पावसाच्या कमी प्रमाणामुळे जिल्हयातील सहा तालुक्यात जानेवारी महिन्यापासूनच भीषण पाणी टंचाई जाणवण्यास सुरवात झाली. पावसाच्या लहरीपणामुळे शेतकर्यांच्या खरीप तसेच रब्बी पिकांचेही नुकसान झाले. परिणामी जनावरे सांभाळणे मुश्कील झाले होते. काही शेतकर्यांनी आपल्याकडील जनावरांची विक्री केली. सांगोला व मंगळवेढा तालुक्यात सर्वात जास्त चारा टंचाई जाणवत आहे. त्यामुळे या दोन तालुक्यात चारा डेपोंना परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान सांगोला व मंगळवेढा तालुक्यातून इतर जिल्हयात किंवा इतर राज्यात चार्याची वाहतूक होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी गोकूळ मवारे यांनी बुधवारी चारा वाहतुकीवर जिल्हा व राज्य बंदी घातली असल्याचा आदेश काढला आहे. ही जिल्हा बंदी ३० जूनपर्यत राहणार असल्याचेही या आदेशात म्हटले आहे. या आदेशाच्या सूचना पोलीस आयुक्त, पोलीस अधिक्षक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर व अकलुज तसेच सर्व तहसिलदार यांना पाठविण्यात आल्या आहेत.
