रविवारी शेतकरी संघटनेचे राज्यभर रास्तारोको आंदोलन

पंढरपूर, दि. २९ – केंद्र सरकारने शेती माल निर्यातीस परवानगी द्यावी या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने रविवार, १ एप्रिल रोजी राज्यभर रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. विश्रामगृह येथे शेतकरी संघटनेच्या सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते.
  राज्यामध्ये चारा टंचाई असताना दुधाचे उत्पादन वाढले आहे. दुधामध्ये भेसळ होत असल्याने उत्पादन वाढले आहे. दूध घेण्यास डेअरी मालक नकार देत आहेत असे सांगून पाटील म्हणाले, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकर्‍यांना फटका बसत आहे. शेत मालाचे उत्पादन वाढले आहे. मात्र शेतकर्‍यांचे आर्थिक उत्पन्न वाढले नाही. विविध कारणांनी शेतकरी कर्जबाजारी होत असून १० वर्षात सांगली जिल्ह्यात १२७ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत असे सांगून पाटील म्हणाले, केंद्र सरकार भांडवालशाहीला धार्जिणे आहे.
  कापूस निर्यातीला बंदी मात्र कापड निर्यातीला नाही. गहू निर्यातील बंदी मात्र बिस्किटाला नाही असा अजब कारभार केंद्र सरकारचा आहे. केंद्राच्या धोरणाविषयी आवाज उठविण्यासाठी १ एप्रिल रोजी राज्यभर रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे.