पुणे, दि. २८- प्रत्येकजण काही लेखक किवा कलावंत असू शकत नाही. आपण लेखक-कलावंत असू किवा नसू, जगण्यासाठी माणूसपणाचे भान महत्त्वाचे आहे, असे मत नारी समता मंचच्या अध्यक्षा आणि मिळून सार्याजणी मासिकाच्या संपादक विद्या बाळ यांनी व्यक्त केले. माणूसपणाचे भान लेखनात उतरायचे असेल तर, ते आधी जगण्यात असले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
साहित्यप्रेमी महिला मंडळात आयोजित कार्यक्रमात भान जगण्याचे आणि लिहिण्याचे या विषयावर विद्या बाळ यांनी संवाद साधला. मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मंदा खांडगे आणि कार्याध्यक्षा डॉ. ज्योत्स्ना आफळे यावेळी उपस्थित होत्या.
विद्या बाळ म्हणाल्या, काहीजण प्रसिद्धीचा विचार करूनच लेखन करतात असा अनुभव आहे. तर, जगण्याचे भान असलेला लेखक हा स्वतःच्या लेखन प्रक्रियेमध्ये बुडून जातो. लेखनाकडे गंभीरतेने आणि सखोलपणे पाहणारे आपल्या अनुभवांमध्ये कलात्मकतेचा प्राण ओततात. स्त्री-पुरुष विषमता आणि शिक्षण, धर्म, जाती यामुळे होणारी विषमता हे विषय स्त्रियांच्या लेखनात प्रभावीपणे आले पाहिजेत. समतेसाठी झगडणार्या पक्षांमध्ये किती असमानता आहे याची उदाहरणे काही लेखनामध्ये आली आहेत. सामाजिक, राजकीय घटनांविषयी उदासीन न राहता लेखन करणे महत्त्वाचे आहे. स्त्री-पुरुष ही परस्परांशी युद्ध करणारी माणसे नाहीत. तर, बरोबरीने राहून सहमतीने आयुष्य जगण्यासाठी आहेत हे ध्यानात घेतले पाहिजे.
पैसा, प्रसिद्धी मिळेल म्हणून मुलांना गाण्याच्या आणि नृत्याच्या रिअॅलिटी शो मध्ये पाठवणे हे भान नसल्याचे उदाहरण आहे. गरज आणि हाव यातील तारतम्य सुटल्याने ही परिस्थिती उदभवली आहे. पैसा कमावण्याच्या नादात घरातील माणसांना आपण वेळ देऊ शकत नाही हे वास्तव आहे. उत्सवी स्वरूपाच्या महिला मंडळांपेक्षाही स्वमदत महिला गट सुरू करण्याची आवश्यकता आहे. लोकांना खूष करून जगणे म्हणजे चांगुलपणा नव्हे. तर, जगण्यासाठी आवश्यक चांगल्या मूल्यांच्या स्वीकार म्हणजे चांगुलपणा हे लक्षात घेतले पाहिजे, असेही विद्या बाळ यांनी सांगितले.
मंडळाच्या कार्यवाह डॉ. रंजना फडके यांनी सूत्रसंचालन केले.
