पूर्णेकाठच्या टरबूज व खरबुजांची चव बदलली

अमरावती,दि. २७ – वर्षानुवर्षे पूर्णा नदीकाठचे टरबूज आणि खरबूज त्यांच्या गोडीसाठी सर्वदूर परिचित आहेत. परंतु, सिंचन सुविधेअभावी यावर्षी या फळांची पार चवच बदललेली दिसून येत आहे. पूर्णेच्या काठावर ग्रामीण परिसर वसला आहे. काही वर्षापूर्वीपर्यंत पायी प्रवास करणारेच या पूर्णाकाठाने येणे जाणे करीत होते. अशा पादाचार्‍यांना पूर्णाकाठाचे टरबूज आणि खरबूज क्षणभर दिलासा देत आणि त्यांचा शीण घालवत. आता ही टरबुजे आणि खरबुजे बाजारपेठेत जाऊन पोहोचली आहेत.
  पूर्णाकाठच्या टरबूज आणि खरबूज यांची गोडी काही औरच. पूर्णेच्या पाण्याची गोडी या फळामध्ये उतरत होती. या फळाची मागणी वाढत गेली. त्यामुळे हळूहळू उत्पादनही वाढले. परंतु आता पूर्णेत पुरेसे पाणी नसल्यामुळे या फळांची चव बदललेली आहे. पूर्णाकाठी असलेल्या ब्राह्मवाडा थडी, मासोद, कुरळपूर्णा, फुबगाव, थुगांवपूर्णा, तुळजापूर आदी गावात नदीच्याकाठी या फळांची लागवड केली जाते. जानेवारी फेब्रुवारी महिन्यापासून शेतकरी कामाला लागतात.
  पूर्वी या फळांच्या वाढीसाठी नदीच्या पाण्याचा वापर केला जात असे. परंतु, यावर्षी डिसेंबर महिन्यापासूनच पूर्णा कोरडी होत गेली आणि आता तर पूर्णेवर धरण झाल्यामुळे नदीत पाणी केव्हा ठेवायचे आणि केव्हा नाही हा अधिकार पाटबंधारे विभागाने आपल्याकडे घेतला आहे. पूर्णानदी आणि टरबूज खरबूजाच्या शेतीवर अनेक लहानलहान शेतकर्‍यांचे जीवन अवलंबून आहे. पूर्णेच्या पाटाने अनेकांच्या जीवनात पहाट फुलविली. उदारनिर्वाहाचा प्रश्न सोडविला.
  टरबूज आणि खरबूजाची शेती करण्यापासून तर बाजारपेठेत त्यांची विक्री होईपर्यंत अनेकांना रोजगारही या पूर्णेमुळेच मिळाला होता. परंतु आता त्यांच्या समोर रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे. एका एकराच्या टरबुजाच्या उत्पादनासाठी जवळजवळ दहा हजार रुपये खर्च येतो. यावर्षी मात्र दोन स्तरावर शेतकर्‍यांचे नुकसान झाले. एकीकडे पाण्याचा अभाव तर दुसरीकडे रोगांच्या प्रादूर्भावामुळे टरबूज, खरबूज उत्पादकांना जबर फटका बसला आहे.