गडचिरोलीत नक्षलवादी हल्ल्यात १६ जवान ठार

गडचिरोली, दि. २७ – धानोरा तालुक्यातील पुश्तोळा गावाजवळ नक्षलवाद्यांनी मंगळवारी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) १६ जवान ठार झाले. नक्षलवाद्यांनी जवानांच्या बसला लक्ष्य बनविले होते. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सर्व जवान सीआरपीएफच्या १९२ बटालियनचे होते.
 केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान पुश्तोळा येथून गत्ता येथे जात होते. यावेळी नक्षलवाद्यांनी हल्ला केला. गत्ताच्या पूर्वेला छत्तीसगड, दक्षिणेला आंध्र प्रदेश आणि उत्तरेला मध्य प्रदेश आहे. हे ठिकाण वेगळे असल्यामुळे जवानांच्या मदतीमध्ये अडथळा निर्माण झाला. ही बातमी कळताच महाराष्ट्र राज्य पोलिस महानिर्देशकांनी लगेच गडचिरोलीकडे धाव घेतली.
  दरम्यान, या भागात नक्षलवाद्यांचा हा पहिला हल्ला नसून २००९ मधील हल्ल्यात १७ जण ठार झाले होते. तर गतवर्षी चार पोलिस ठार झाले होते.