पुणे दि.२४(प्रतिनिधी)-गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नारायणगांव येथील तमाशा पंढरीत दिवसभरात तब्बल सव्वा दोन कोटी रूपयांची उलाढाल झाल्याचे वृत्त आहे. रघुवीर खेडकर यांच्या तमाशाला काल सर्वात मोठी म्हणजे सव्वा दोन लाख रूपयांची सुपारी मिळाल्याचेही सांगण्यात आले. रात्री उशीरापर्यंत या तमाशा पंढरीत तमाशाचे खेळ ठरवायला आलेल्यांची लगबग सुरू होती.
नववर्षाचा पहिला दिवस आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचा हा दिवस तमाशा क्षेत्रासाठीही महत्त्वाचा दिवस असतो. नारायणगांव येथे दरवर्षी भरणार्या तमाशा पंढरीत राज्यभरातील तमाशा फडमालक आपापल्या राहुट्या लावतात आणि गावोगावीचे तलाठी, सरपंच, पुढारी, पंच, ग्रामस्थ आपापल्या गावातील यात्रा जत्रांसाठी तमाशाची सुपारी द्यायला येतात. यंदा मंदी जाणवत असली तरी तमाशांना चांगली मागणी असल्याने फडमालक सुखावले आहेत.
नारायणगांवात यंदा दरवर्षीच्या तुलनेत ९ पाले कमी लागली होती. मात्र पुणे, नाशिक, नगर,कोल्हापूर,सोलापूर, सांगली ठाणे, बीड,औरंगाबाद, सातारा अशा राज्याच्या विविध जिल्हयातून आलेल्या तमाशा प्रेमींनी नारायणगांवात काल गर्दीच केली होती. विविध जिल्हा पंच कमिट्यांचे सदस्य तमाशाच्या खेळासाठी घासाघीस करून आणि आपल्याला हवा त्यादिवशीच आपल्या आवडीचा तमाशा केला जावा यासाठी प्रयत्न करताना दिसून येत होते.
पाडवा आणि पाडव्याचा दुसरा दिवस अशी दोन दिवस ही तमाशा पंढरी भरते आणि या दोन दिवसांत साधारणपणे चारशे तमाशा खेळांचे बुकींग होते असे अंजली नाशिककर तमाशा मंडळाचे फडमालक आणि तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजी जाधव यांनी सांगितले.