कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढीने कठोर निर्णय घेण्याची गरज – प्रणव मुखर्जी

नवी दिल्ली, दि. २४- जगभरात कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याने येत्या काही महिन्यांत केंद्र सराकारला कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे सुतोवाच केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी केले. ते म्हणाले, लक्ष्यापर्यंत पोहचण्यासाठी केंद्र सरकारला येत्या महिन्यात काही महत्वाचे व कठोर निर्णय घ्यावे लागतील व त्यांची अंमलबजावणी देखील करावी लागेल. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीज (फिक्की) या संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
 वस्तुस्थितीपासून फारकत घेऊन काम करता येत नाही. फक्त अर्थसंकल्पाने सर्व गोष्टी साध्य होत नाहीत. मी वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करु शकत नाही, असे ते म्हणाले. मात्र येत्या काही दिवसांत व्याजदर कमी होण्याची सरकारला आशा आहे, असे सांगून त्यांनी महागाई कमी होण्याचे संकेत दिले.
   गेल्या तीन महिन्यांपासून महागाई कमी झाली असल्याचे सांगून उद्योग धंद्यात विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी पत धोरणात बदल करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. येत्या काही महिन्यात कच्च्या तेलाची किमत वाढणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या कच्च्या तेलाची किमत १२५ डॉलर प्रति बॅरल आहे.