नागपूर, दि. २४ – राज्य शासनाने डिसेंबर महिन्यापर्यंत राज्याला भारनियमनमुक्त करण्याची घोषणा केली होती. वेगवेगळे प्रकल्प आणि संच कार्यान्वित करण्याचे दावे केले होते. मात्र, एकही नवा संच अद्याप कार्यान्वित होऊ शकला नाही. याशिवाय तुलनेत वीजनिर्मितीचा वेगसुद्धा मंदावला असल्याने येत्या उन्हाळ्यात भार नियमनाचे चटके विदर्भवासियांना बसणार आहेत. खापरखेडा येथील पाचशे मेगावॉट आणि भुसावळ येथील पाचशे मेगावॉटचे दोन संच मार्च महिन्यात कायान्वित होणार होते. चंद्रपूरचे दोन संच ऑक्टोबर २०१३ आणि फेब्रुवारी २०१४ मध्ये कार्यान्वित होणार आहेत.
कोराडीच्या तीन संचांचे काम सुरू असून, येत्या उन्हाळ्यापूर्वी येथून वीजनिर्मिती होणार नाही. फक्त परळीच्या अडीचशे मेगावॉटच्या संचामधून वीजनिर्मिती सुरू झाली आहे. यामुळे उन्हाळायात विजेची मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत निर्माण होणार आहे. याची झळ ग्रामीण भागासह शहरांनाही बसणार असल्याचे दिसून येते. औष्णिक वीज प्रकल्पाची मागच्या मार्च महिन्यातील निर्मिती पाच हजार ६१५ मेगावॉट इतकी होती. वायु प्रकल्पातून ६५५ मेगावॉट वीज उपलब्ध होती. यावर्षी मार्च महिन्यात औष्णिक प्रकल्पाच्या वीजनिर्मितीचा आकडा चार हजार ८५१ मेगावॉट इतका आहे, तर वायु प्रकल्पातून फक्त ३७७ मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे. यावरून वीजनिर्मितीचा वेग मंदावला असल्याचे स्पष्ट होते.
गेल्या वर्षी २१ मार्चपर्यंत महानिर्मितीच्या औष्णिक व वायु प्रकल्पाची वीजनिर्मितीची कमान चढती होती. १३ मार्चला सर्वाधिक ५८८२ मेगावॉट इतके विजेचे उत्पादन औष्णिक प्रकल्पातून झाले होते. यंदा चालू मार्च महिन्यात वीज उत्पादनाचा टक्का घसरला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत चालू महिन्याच्या १३ तारखेला तब्बल ५०० मेगावॉटने वीज उत्पादन घटले आहे. वायु प्रकल्पातील सरासरी वीजनिर्मिती १२५ मेगावॉटने कमी झाली आहे. साधारणतः एप्रिल व मे महिन्यात विजेच्या मागणीत वाढ होते. मागील वर्षी मे महिन्यात विजेची मागणी १७०० मेगावॉटने वाढली होती.
