भूवनेश्वर, दि. २४ – भारतीय जनता पक्ष व काँग्रेसच्या सदस्यांनी शनिवारी ओडीसा विधानसभेत माओवाद्यांनी बिजू जनता दलाच्या आमदाराचे अपहरण केल्याप्रकरणी गोंधळ घातला. यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली व प्रश्नोत्तराचा तास सुरु होईपर्यंत विधानसभा अध्यक्षांच्या स्थानांसमर ठाण मांडले. मुख्यमंत्री नवीन पटनायक बोलत असतानाही त्यांनी गोंधळ सुरुच ठेवला होता.
आमदार जिन्हा हीकाका यांचे कोरापूट येथील डोंगराळ भागातून सशस्त्र माओवाद्यांनी अपहरण केले, असे पोलिसांनी सांगितले. याच माओवाद्यांनी दहा दिवसांपूर्वी दोन इटालियन पर्यटकांचे अपहरण केले होते. यामधून मार्ग शोधण्यासाठी सरकार व माओवाद्यांमध्ये चर्चा सुरु आहे. राज्य पोलिस दलाच्या अधिकार्यांना चौकशी करण्यासाठी घटनास्थळी पाठविण्यात आले आहे. तसेच दोन वरीष्ठ नेते या ठिकाणाची पाहणी करण्यासाठी जाणार आहेत, असे मुख्यमंत्री पटनायक यांनी येथे सांगितले.
