वॉशिंग्टन, दि. २४ – पुरेशा शासकीय कागदपत्रांविना बेकायदेशीररित्या अमेरिकेत राहणार्या सुमारे सव्वा कोटी विदेशी नागरिकांमध्ये अंदाजे अडीच लाख भारतीयांचा समावेश आहे. अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी येणार्या भारतीयांचे प्रमाण अलीकडे खूपच वाढले आहे. गेल्या २००० ते २०११ या दशकाच्या कालावधीत ही संख्या दुपटीने वाढली असल्याचा अहवाल अमेरिकेच्या देशांतर्गत सुरक्षा विभागाने सादर केला आहे.
या कालावधीत अवैधरीत्या राहणार्या परदेशी नागरिकांची संख्या ८४.६ लाखांवरून १.१५ कोटी झाली आहे. अमेरिकेमध्ये अवैधरित्या राहणार्या २.४० लाख नागरिकांसह भारत सातव्या क्रमांकावर आहे. तर मेक्सिको ६८ लाख नागरिकांसह प्रथम क्रमांकावर आहे. त्याचबरोबर ईआय सॅल्वेडॉर (६.६० लाख), ग्वाटेमाला (५.२० लाख ) आणि होंडूरास (३.८० लाख) यांच्यासह या यादीत चीन पाचव्या क्रमांकावर आहे. पण अवैधरित्या राहणार्या आशियाई नागरिकांमध्ये २.८० लाख नागरिकांसह चीनचा प्रथम क्रमांक आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहरात सर्वात जास्त प्रमाणात अवैध नागरीक राहतात.
