
मुंबई, दि.२२ – देशातील मोठा उद्योग समूह असलेल्या महिंद्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. समूहातील आयटी क्षेत्राची धुरा सांभाळणार्या टेक महिंद्रा आणि महिंद्रा सत्यम या दोन कंपन्यांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय महिंद्रा समूहाने घेतला आहे. यामुळे २.४ अब्ज डॉलरची वार्षिक उलाढाल असणारी टेक महिंद्रा आयटी क्षेत्रातील पाचवी मोठी कंपनी होणार आहे.
विलीनीकरणामुळे सत्यममध्ये १७ शेअर असणार्या गुंतवणूकदारांना टेक महिंद्राचे २ शेअर देण्यात येतील. विलीनीकरणामुळे कंपनीला भविष्यातील व्यावसायिक लक्ष्य साध्य करणे अधिक सोपे होणार असून, नवीन कंपनी लवकरच यासाठी सज्ज होईल, असे टेक महिंद्राचे उपाध्यक्ष विनीत नायर यांनी सांगितले. विलीनीकरणाची प्रक्रिया हा कंपनीचा एक धोरणात्मक भाग असल्याचे नायर यांनी सांगितले.
पाच वर्षांपूर्वी २००८ मध्ये सत्यम कम्प्युटरमध्ये कंपनी तत्कालीन अध्यक्ष रामसिंगा राजू याने ७००० कोटींचा आर्थिक घोटाळा केला होता त्यानंतर शेअर बाजारात कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली व गुंतवणूकदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या चुराडा झाला. यामुळे कंपनीच्या भविष्याबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले होते.
