किंगफिशरची आंतरराष्ट्रीय उड्डाणे २५ मार्चपासून रद्द

नवी दिल्ली, दि. २१ – किंगफिशर एअरलाईन्सने २५ मार्चपासून आपली सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कंपनीचे मालक विजय मल्ल्या यांनी बुधवारी दिली. कंपनीच्या विमानात प्रवाशांच्या सुरक्षेचा व्यवस्थेत कमतरता आढळल्यास किंगफिशरचा परवाना रद्द करण्यात येऊ शकतो, असा इशारा सरकारने त्यांना दिला होता. तसेच किंगफिशर येत्या काही दिवसांत देशांतर्गत उड्डाणंमध्येही कपात करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय वाहतूक संस्था आयटाच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सेवा चालविण्यात काहीच अर्थ नाही. म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला आहे, असे मल्ल्या म्हणाले. नागरी विमान वाहतूक नियामक प्राधिकरणाच्या महासंचालकासोबत मल्ल्या यांची सुमारे दीड तास चर्चा झाली. त्यानंतर मल्या म्हणाले की, आम्ही कोणतेही मोठे लक्ष्य ठेवलेले नाही. त्यामुळे २० विमानांसह उड्डाणे सुरु राहतील. पूर्वी किंगफीशर ६४ विमानांनी ४०० उड्डाणे करीत होते. मात्र नंतर यात कपात करुन फक्त २८ विमानांनी १७० उड्डाणे कंपनी चालवित होती.
  किंगफीशरच्या विमानांमधील सुरक्षा व्यवस्थेवर सरकारने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड करावी लागणार असेल तर आम्ही कोणत्याही विमान कंपनीला उड्डाणांची परवानगी देणार नाही, असे नागरी हवाई वाहतूक मंत्री अजितसिंह यांनी यावेळी सांगितले.