भगवद् गीतेवर बंदीची याचिका रशियन न्यायालयाने फेटाळली; निर्णयाचे भारताकडून स्वागत

मॉस्को, दि. २१ मार्च- हिंदू धर्माचा पवित्र धर्मग्रंथ भगवद् गीता हे भडकावू साहित्य असल्याचे सांगून त्याच्या रशियन अनुवादावर बंदी घालण्यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका बुधवारी रशियन न्यायालयाने फेटाळली आहे. गीता हे अतिरेकी साहित्य असून त्याने समाजात कलह निर्माण होऊ शकतो, अशी याचिका तेथील काही लोकांनी दाखल केली होती. मात्र, सायबेरीयातील तोमस्क सिटी न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. रशियन न्यायालयाच्या या निर्णयाचे भारताने स्वागत केले असून रशियातील आपल्या मित्रांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे हे शक्य झाले आहे, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. 
  तोमस्क येथील सत्र न्यायलयानेही असाच निर्णय दिला होता. या निर्णयाला याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र न्यायालयाने २७ डिसेंबर रोजी सत्र न्यायालयाने सुनावलेला निर्णय कायम ठेवला. आम्ही हा खटला जिंकलो आहे. न्यायालयाने याचिकाकर्त्यांची याचिका फेटाळली आहे, असे इस्कॉन संस्थेचे सदस्य साधू प्रिया दास यांनी फोनवर सांगितले. आम्ही रशियन न्यायव्यवस्थेचे आभारी आहोत, असे ते यावेळी म्हणाले.
  इस्कॉन संस्थेचे संस्थापक भक्तीवेदांत स्वामी प्रभूपाद यांनी गीतेचा रशियन अनुवाद केला आहे. हा ग्रंथ कट्टरवादी व जातीय द्वेष निर्माण करणारा आहे, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. भगवद् गीतेचा रशियन अनुवाद पहिल्यांदा १७८८ मध्ये करण्यात आला होता. त्यानंतर अनेकवेळा विविध आवृत्यांमध्ये या ग्रंथाचे अनुवाद प्रकाशित झाले आहेत.