अंधश्रध्दा निर्मूलन कायदा केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार

पंढरपूर, दि.२१ – चालू अधिवेशनामध्ये शासनाने अंधश्रध्दा निर्मूलन कायदा करण्याचा घाट घातला आहे. या कायद्यामुळे लाखो वारकरी व हिंदू संघटनांची फसवणूक होणार आहे. हा कायदा हिंदू धर्मावर संकट असल्यामुळे तो संमत झाल्यास राज्यात वारकरी फडकरी व हिंदुत्ववादी संघटना तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती ह. भ. प. अनिल काका बडवे, ह. भ. प. बाबा जालनापुरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
  स्वा. सावरकर वाचनालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे आत्माराम रामदासी, सौ. राजश्री तिवारी, श्रीपाद पेटकर, अॅड. नितीन सांगोलकर, ह. भ. प. श्रीराम महाराज बनवसकर, शेखर पाटील आदी उपस्थित होते.
  अंधश्रध्दा निर्मूलन संस्थेला परदेशातून लाखो रूपयांचा निधी येतो, अंधश्रध्दा निर्मूलन समिती (अनिस) शासनावर दबाव  टाकत आहे, जैन धर्माबाबत ही अनिस गैरसमज पसरवित आहे असा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला.
प्रस्ताविक अंधश्रध्दा निर्मूलन कायद्याविषयी वारकरी संप्रदायातील मंडळींना बोलावून तसेच कायद्या विषयी समन्वय समिती नेमण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र या आश्वासनाची पूर्तता न करता शासनाने वारकर्‍यांना विश्वासात न घेता पुन्हा एकदा धर्मविरोधी अंधश्रध्दा निर्मूलन कायदा येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संमत करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे.