मध्य-पूर्व शांतता वार्तेसाठी ओबामांचे पॅलेस्टाईनच्या राष्ट्राध्यक्षांना साकडे

वॉशिंग्टन, दि. २०- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष मेहमूद अब्बास यांच्याशी गेल्या सहा महिन्यांतून पहिल्यांदाच मध्य-पूर्व भागात शांतता प्रस्थापित करण्याच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी सोमवारी वार्ता केली, असे व्हाईट हाऊसने सांगितले.
 व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जे कार्नी म्हणाले, ओबामा यांनी अब्बास यांच्याशी वार्ता करून सांगितले की, ‘मध्य-पूर्व भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका कटिबद्ध आहे. यासाठी दोन्हींकडून प्रयत्न करणे गरजेचे आहे’. ओबामा आणि अब्बास यांची न्यूयॉर्कमध्ये गतवर्षी सप्टेंबरमध्ये भेट झाल्यानंतर दोघांमध्ये झालेली ही पहिली चर्चा आहे. इस्त्राईल आणि पॅलेस्टाईनमध्ये चर्चेला चालना देण्यासाठी जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी ओबामा यांनी प्रशंसा केली आहे असे कार्नी यांनी सांगितले.
  दरम्यान अब्बास यांनी या विषयांवर चर्चा करण्यासाठी ओबामा यांच्यासमोर अट ठेवली आहे. या अटीनुसार, १९६७ च्या मध्य-पूर्व युद्धात ताब्यात घेतलेल्या जमिनीवर पॅलेस्टाईन राज्य निर्माण करण्यास इस्त्राईलने संमती दर्शविण्याची मागणी त्यांनी केली आहे. परंतु, इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ही मागणी मान्य करण्यास नकार दर्शविला आहे.