मुकुल रॉय देशाचे नवे रेल्वेमंत्री

नवी दिल्ली, दि. २०- तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते मुकुल रॉय देशाचे नवीन रेल्वेमंत्री झाले आहेत. रॉय यांनी मंगळवारी राष्ट्रपती भवनात केंद्रीय रेल्वेमंत्री पदाची शपथ ग्रहण केली. माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रॉय यांची रेल्वेमंत्री पदावर नियुक्ती केली गेली आहे. याआधी रॉय हे केंद्रीय राज्य जहाज मंत्री होते.
  देशाचा रेल्वेमंत्री म्हणून मी सुरक्षा व वेळबध्दतेला प्राधान्य देईन, असे रॉय यांनी शपथ ग्रहण केल्यानंतर सांगितले. रेल्वेप्रवास भाडे कमी करण्यासंबंधी विचारले असता, रेल्वे अर्थसंकल्प ही संसंदेची संपत्ती आहे. त्यामुळे याबद्दल मी संसंदेत बोलेन, असे रॉय म्हणाले.
  रॉय यांची रेल्वेमंत्री पदी नियुक्ती होणे हा तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींसाठी मोठा विजय असल्याचे मानले जात आहे. रॉय हे ममतांचे जवळचे व विश्वसनीय नेते आहेत. त्यामुळे ममतांनी त्रिवेदींच्या खुर्चीवर रॉय यांना बसविल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच गेल्यावर्षी ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री झाल्यानंतर रिकाम्या रेल्वेमंत्री पदासाठी त्यांनी रॉय यांचे नाव पुढे केले होते.
  रॉय यांना रेल्वे मंत्रिपद देण्यास सुरुवातीला पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांचा विरोध होता. मात्र, आघाडीच्या राजकारणामुळे त्यांना शरणागती पत्करावी लागली. माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदींनी आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात रेल्वेच्या वाढत्या गरजांना लक्षात घेऊन तब्बल आठ वर्षानंतर प्रवासभाड्यात वाढ केली होती. त्यांच्या अर्थसंकल्पाला पंतप्रधानांसह इतर नेत्यांनीही हिरवा कंदील दिला होता. मात्र, त्यांच्या या कठोर निर्णयाने त्यांना आपले पद गमवावे लागले.
  त्यांच्याच पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींनी त्रिवेदींच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तृणमूल काँग्रेसने मंगळवारी बोलाविलेल्या बैठकीत त्रिवेदीही सामील होते. ही बैठक चांगल्या पध्दतीने पार पडली असून त्रिवेदी पक्षासोबत काम सुरु ठेवतील, असे ममता बॅनर्जींनी यावेळी सांगितले. मुकुल रॉय हे गेल्या सहा वर्षांपासून तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत. त्यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वासाठी पुन्हा आपला अर्ज भरला आहे.