आजही आठवते बालपण – सलील

नागपूर, दि. १९ – वयाची पस्तीशी ओलांडून डोंगर सर केल्यानंतर माथ्यावर उभे राहून मागे बघाल तर बालपणच दिसते. शाळेतल्या दिवसांची गोष्ट निघाली तर आठवते ती मधलीसुट्टी. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात अनुभवलेली ही मधली सुट्टी म्हणजे आठवणीचे संचित असते. अशा भावना सुप्रसिद्ध गायक संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
झी वाहिनीवर अलीकडेच सुरु झालेल्या मधलीसुट्टी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनसोक्त गप्पा मारल्या. तो म्हणाला, बालपणातील दिवस हे एकदम खरे असतात. त्यामध्ये व्यवहार, औपचारिक मैत्री या सर्व गोष्टी नसतात. आज आपण कामाच्या निमित्ताने म्हणा किंवा व्यवसायाच्या निमित्ताने मैत्री करतो. या मैत्रीत तो सच्चेपणा नसतो, जो बालपणात असतो. आर्थिक, सामाजिक परिस्थितीवर आधारित बालपणातील मैत्री नसते. त्यामुळे माझे त्याकडे जास्त आकर्षण आहे. प्रत्येकाला विशिष्ट वयात या बालपणातील दिवसांची प्रकर्षाने आठवण येत असते. मी मात्र त्यात कायमच रमतो, एवढाच फरक आहे.मधली सुटी या कार्यक्रमातही मी पहिल्या बाकापासून ते शेवटच्या बाकापर्यंत प्रत्येक मुलांशी गप्पा मारतो.
एवढेच कशाला तर वर्गातून बाहेर हाकललेल्या आणि खोडकर विद्यार्थ्यांसोबतही तेवढ्याच आत्मीयतेने बोलतो. मी मुलांचे ऐकतो, त्यांचा श्रोता होतो. त्यामुळे ते माझ्याजवळ येतात, असेही तो सांगतो. आत्ताच्या पिढीतील लहान मुलांच्या हातात जादूची कांडी दिली तर त्यांना पु. ल. देशपांडे जिवंत व्हावे, असे वाटते तर एका अंध विद्यार्थ्याला सचिन तेंडुलकरचे शंभरावे शतक जादूच्या कांडीवरच पूर्ण करावेसे वाटते. मुलांना बोलू द्या, त्यांना आपले कुणीतरी ऐकावे असेच वाटत असते.