अर्थसंकल्पामुळे बाजार महागला

नागपूर, दि. १९ – केंद्रीय अर्थसंकल्पात केलेल्या उत्पादन शुल्क व सेवा करातील वाढीमुळे बाजार महागला आहे. सरत्या आठवड्यात तूर, चणा डाळीसह तसेच गहू तांदळाच्या दरात वाढ झाली. तुरीचे दर मागील आठवड्यात ३२७५ होते. ते या आठवड्यात ३३५० रुपये प्रति क़्विटलवर आले. यामुळे तुरडाळीच्या दरातही घाऊक बाजारात क्विटलमागे १०० रुपयांची वाढ झाली.
चण्याचे दरही ३२५० हून ३३५० रुपये प्रति क्विटलवर आले. यामुळे चणाडाळीत १०० ते २०० रुपयांची वाढ होऊन ते ४१५० ते ४२५० रुपये प्रति क्विटलवर आली. ग्रेन मर्चंटस् असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी म्हणाले की, अर्थसंकल्पातील करवाढीचे अप्रत्यक्ष परिणाम बाजारावर होऊ लागले आहे. त्यातच आता मार्चअखेरीस ग्राहकांच्या अखेरच्या खरेदीसाठी गर्दी झाली आहे. यंदा तुर व चण्याचे पीक कमी आहे. त्यामुळेच आता बाजार हळूहळू महाग होत जाईल.