
अहमदनगर, दि. १९ – नगर जिल्ह्यात आगामी पावसाळ्यापूर्वी मोठया प्रमाणावर शेततळी उभारणीचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आला असून आतापर्यंत जिल्ह्यात ४० कोटी ४६ लाख रूपये खर्च करून तब्बल ७ हजार शेत तळ्यांच्या उभारणीचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
पाणी टंचाईच्या काळात जिल्ह्यातील फळबागांसह पिकांना आधार देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत हा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. त्यानुसार तब्बल ७ हजार शेततळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्याकरिता ४० कोटी ४६ लाख रूपये खर्च करण्यात आला आहेत. प्रशासनाकडून मजुरांच्या हाताला काम व सिंचनाच्या कामाला प्राधान्य देण्याचे धोरण जिल्ह्यात प्रभावीपणे राबविले जात आहे. त्यासाठी नव्याने शेततळी तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. संपूर्ण जिल्हाभर सध्या दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शेततळी व विहिरींच्या पुनर्भरणाची कामे केली जात आहेत. आगामी पावसाळ्यापूर्वी नगर जिल्ह्यात जास्तीत जास्त शेततळी उभारली जावीत, असे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहे.
दरम्यान जिल्ह्यात निर्माण होणार्या या शेततळ्यांमध्ये मत्स्य व्यवसाय करण्यासाठी शेतकर्यांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले जात असून त्याकरीता त्यांना अनुदान व मत्स्य बीज पुरवठा करण्याचे देखील नियोजन केले जात आहे. यासाठी एप्रिल महिन्यात विशेष प्रशिक्षण देखील जिल्हा मत्स्य व्यवसाय विभागाकडून देण्यात येणार आहे.
