कृषी, ग्रामविकासाला चालना देणारा अर्थसंकल्प, मुख्यमंत्र्यांनी केले अर्थसंकल्पाचे स्वागत

मुंबई, दि. १६ – कृषी क्षेत्रासाठी १ लाख कोटींची ज्यादा तरतूद, शेतकर्‍यांसाठी थेट सबसीडी, ग्रामीण भागात घरबांधणीला प्रोत्साहन, ग्रामस्वच्छता, खेड्यापाड्यातील रस्ते, पिण्याचे पाणी यासाठी भरीव तरतूद केल्यामुळे देशातील कृषी अर्थव्यवस्थेला उर्जा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. विदर्भातील कृषी सिंचनासाठी केलेली ३०० कोटींची तरतूद आणि इचलकरंजी येथील यंत्रमाग क्लस्टरसाठी केलेली ७० कोटीची तरतूद स्वागतार्ह असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
  कृषी क्षेत्रासाठी वित्तीय तरतूद १ लाख कोटींनी वाढवल्यामुळे देशातील शेतीची अवस्था सुधारण्यास मदत होणार आहे. किसान क्रेडीट कार्ड ए. टी. एम. केंद्रावरून वापरता येणार असल्याने शेतकर्‍यांची सोय होणार आहे. ग्रामीण बँकांना अर्थपुरवठा करण्यासाठी नाबार्डला १० हजार कोटी देण्याची वित्तमंत्र्यांची घोषणा ही दिलासादायक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. जागतिक बँकेच्या साहाय्याने २४० कोटींचा दुध प्रकल्प उभारणे, अन्नधान्यासाठी नवीन गोदामे, अन्न प्रक्रियेसाठी राष्ट्रीय मिशन, लघु सिंचनासाठी स्वतंत्र कंपनी याचप्रमाणे वेळेवर कर्ज परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना ३ टक्के ज्यादा व्याज सवलत या निर्णयामुळे एकूण ग्रामविकासाला चालना मिळेल, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी म्हटले आहे.