चीनपासून भारताला धोका नाही- स्वामी

नागपूर, दि. १६ – चीन आर्थिक महासत्ता असून हिंदुस्थानपेक्षा त्याचे बळ जास्त आहे किवा चीन भारतावर आक्रमण करणार, असे बोलले जात असले तरी त्यात काही अर्थ नाही. हिंदुस्थानच्या तुलनेत चीनने मधल्या काळात आर्थिक प्रगती केली, पण एकूण दोन्ही देशाची प्रगती सारखीच आहे. भारत अधिक संपन्न आहे. चीनचा संभाव्य धोका ओळखून भारताने वाटचाल केली तर चीनपासून हिंदुस्थानला भविष्यात धोका नाही, असे प्रतिपादन जनता पार्टीचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामी यांनी केले.
  सहकार भारती नागपूर महानगर तर्फे स्वामी यांचे चीनचा भारताला असणारा संभाव्य धोका आणि उपाय या विषयावर व्याख्यान झाले. सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मराठे अध्यक्षस्थानी होते.
  सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, ३०० वर्षांपूर्वी चीन भारताला स्वर्ग मानत होता. भारतीय संस्काराला त्याची मान्यता होती, पण भारतावर इंग्रजांचे राज्य आल्यावर त्यांनी १९४७ पर्यंत कृषी शोषण केले. याच काळात भारतासह चीनचाही जीडीपी कमी झाला. चीन कम्युनिस्ट झाल्यानंतर मात्र त्याचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. प्रत्यक्षात चीन आणि भारताची प्रगती सारख्याच पातळीवर होती. यापेक्षा भारताची सर्व क्षेत्रातील प्रगती डोळ्यात भरणारी नसली तरी शाश्वत आहे. मुळात चिनी वस्तू जागतिक बाजारपेठेत विकल्या जातात, असे बोलले जात असले तरी त्याचे उत्पादन चीन करीत नाही. चीनच्या शेजारील राष्ट्रातून तयार वस्तूंवर मेड इन चायना असे लेबल टाकून वस्तूंची विक्री केली जाते. त्यामागे अमेरिकेशी आणि जागतिक बाजारपेठेशी संबंधित कारणे आहेत. चीनला तयार होणारा पुरवठा कधीही बंद होऊ शकतो आणि त्यात आपल्या देशाची भूमिका महत्त्वाची आहे. चीनने कृषी व्यवस्थेकडे, उद्योगाकडे लक्ष दिले आणि अंतर्गत व्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता. त्या भरवश्यावर चीनने १९८० ते ९५ या काळात निर्यातीतून प्रचंड पैसा मिळविला. त्यानंतर भारत आणि चीनची अर्थव्यवस्था सारखीच आहे, असेही त्यांनी सांगितले.