नागपूर, दि. १६ मार्च – वाघाने शेतात शिरून केलेल्या नुकसानाची भरपाई राज्य सरकारने द्यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी दिले. वर्ध्यातील शेतकर्याने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्या. शरद बोबडे व न्या. प्रसन्न वराळे यांनी संयुक्तरित्या हे आदेश दिले.
वाघाने सतत तीन महिने आपल्या केळीच्या बागेत वास्तव्य करून पिकाचे नुकसान केल्याने शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका वर्धा जिल्ह्यातील शेतकरी बाबूराव आगलावे यांनी दाखल केली होती. बाबूराव आगलावे यांचे शेत बोर अभयारण्यानजीक असून तेथे त्यांनी केळीची बाग लावली आहे. एप्रिल २०१० मध्ये तीन वाघांनी शेतात शिरून आगलावेंच्या गाईचा बळी घेतला.
या प्रकरणी आगलावे यांनी शासनाकडे नुकसानभरपाईचा अर्ज केला आणि त्यांना सरकारकडून नुकसानभरपाई देखील प्राप्त झाली. त्यानंतर हे वाघ सतत तीन महिने आपल्या शेतात वास्तव्यास होते आणि त्यांनी केळीच्या बागेचे नुकसान केले असून त्याचीही नुकसान भरपाई मिळावी अशी आगलावे यांची मागणी होती. या घटनेचा सिंचन आणि वन विभागाने पंचनामा केला होता. या प्रकरणी आगलावे यांना ३ लाख ८४ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी असा अहवालही वित्त विभागाकडे पाठवण्यात आला, मात्र वित्त विभागाने हा अहवाल फेटाळल्यामुळे आगलावे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
