नागपूर, दि. १६ मार्च- जीवनात आलेली संकटे हीच महिलांची खरी ऊर्जा असल्यामुळे जीवनात कितीही संकटे आली तरी त्याला सामोरे जात आनंदाने जीवन जगा, एक दिवस संकट तुमच्यापासून दूर होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी व्यक्त केले.
मैत्रेयी फाऊंडेशन संचालित कॅन्सर रुग्ण असोसिएशनतर्फे महिलांसाठी कर्करोग जागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला सुकन्या कुळकर्णी, हिंदुजा रुग्णालयातील कर्करोगतज्ज्ञ डॉ. डोणगावकर, मुंबईच्या अंबानी रुग्णालयातील स्तन शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. मदर नाडकर्णी, मैत्री समुहाच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक वर्षा सत्पाळकर, डॉ. संध्या पटवर्धन आदी उपस्थित होते.
सिंधूताई सपकाळ म्हणाल्या की, माझ्या आयुष्यात अनेक संकटे आली. मात्र, त्या संकटातून मी मार्ग काढत गेले आणि आज हजारो लेकरांची माई म्हणून तुमच्यासमोर आहे. घरात बाप असला तरी स्त्रीला कुटुंबाची संकटे झेलावी लागतात आणि त्यामुळे ती तशीच सक्षम असते. ती जर सक्षम नसेल तर कुटुंबही सक्षम राहत नाही. महिलांनी कुठल्याही गोष्टीचा आकस आणि अहंकार न ठेवता समाजात, कुटुंबात काम केले पाहिजे. ज्या दिवशी अहंकार आला त्या दिवशी स्त्रीमधील स्त्रीत्व नष्ट होऊन जाईल. पतीने मला घरातून बाहेर काढल्यावर मी त्यावेळी जगण्याचा विचार केला नसता तर आज कदाचित सिंधूताई सपकाळ तुमच्यासमोर आली नसती. त्यावेळच्या परिस्थितीने मला जगायला शिकविले आहे.
काट्यांवर चालायला शिकले तर एक दिवस काटेसुद्धा तुम्हाला जीवनात चालायला शिकवतात. मी स्मशानात राहिले आहे, त्यामुळे आज कशाचीही भीती वाटत नाही. भीती तर आज जिवंत माणसांची वाटायला पाहिजे. मेलेल्या माणसांपासून कुठलीच भीती राहत नाही. स्त्रीच्या मागे दुःख ही असतातच. मात्र, त्या दुःखाचा शोध घ्या आणि आणि जीवन जगा, असा सल्ला सिंधूताई सपकाळ यांनी दिला.
